फलटण : श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय हे शेती व शेतकरीभिमुख उपक्रम राबवण्यात अग्रेसर असतात. त्यांच्यावतीने फलटण येथे आयोजित करण्यात आलेले ‘श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५’ शेतकऱ्यांना निश्चितपणे प्रेरक व मार्गदर्शक ठरेल असा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी व्यक्त केला.
फलटण येथे दोन जानेवारी ते सहा जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५’ चा शुभारंभ कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, भोजराज नाईक निंबाळकर, दत्ता अनपट, शरद रणवरे, बाळासाहेब शेंडे, रणजीत निंबाळकर, रमणशेठ दोशी, शिरीष दोशी, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, शिरीष भोसले, सी. डी. पाटील, अरविंद निकम व कृषि विभागातील अधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी विविध मुद्द्यावर मार्गदर्शन करून डिजिटल ॲग्रीकल्चर, गट शेती आधारित उपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती तंत्रज्ञान याबाबताचे महत्वही डॉ. पी. जी. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
हवामान आधारित शेती साठी बदललेले ऋतुचक्र, तापमान वाढीचे बदल व शेतीवर होणारे परिणाम, जागतिक तापमान वाढीचे परिणाम यावर आधारित अभ्यास केंद्र स्थापन करण्यात यावे, आधुनिक शेती तंत्रज्ञान आधारित शेतीकडे लक्ष द्यावे अशा विविध मुद्द्याकडे यावेळी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. प्राचार्य डॉ. यू. डी.चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्याच्या कार्याचा आढावा विषद केला. प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचा अल्प परिचय व त्यांचा सामाजिक, राजकीय कामकाजाचा आढावा सविस्तर विषद केला.
कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांचा सन्मान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व मानाची चांदीची तलवार देऊन करण्यात आला. त्याचबरोबर तालुक्यातील ऊस उत्पादक चंद्रकांत बेलदार, सरडे, द्राक्ष उत्पादक हिंदुराव सूळ, खडकी, भाजीपाला उत्पादक बाबुराव गायकवाड, फडतरवाडी, दूध उत्पादक सौ. स्वाती पवार मुंजवडी, डाळिंब उत्पादक चंद्रकांत आहिरेकर, वाठार निंबाळकर या शेतकऱ्यांचाहि विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. आर. ससाने, कुमारी श्रेया गायकवाड, कुमारी तनिष्का दौंडकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. ए. पी. रणवरे यांनी केले. यावेळी फलटण तालुक्यातील शेतकरी, दोन्ही महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.