फलटण : सातारा जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता १२२ गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार मंजुर करण्याच्या दुष्टीने जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यामध्ये फलटण तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे.
नवीन रास्त भाव दुकानाच्या मंजूरीकरीता संबंधित ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यापैकी ज्यांना अर्ज करावयाचे असतील, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधून १ जानेवारी पासून ३१ जानेवारी २०२५ अखेर आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदारांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
नवीन रास्तभाव दुकान प्राधान्यकमानुसार मंजूरी करीता फलटण तालुक्यातील गोळेवाडी, चांभारवाडी, मानेवाडी, भाडळी बू. या गावांचा तसेच सातारा तालुक्यातील १०, वाई तालुक्यातील १७, कराड तालुक्यातील ७, महाबळेश्वर तालुक्यातील ४४, कोरेगाव तालुक्यातील १०, खटाव तालुक्यातील ९, फलटण तालुक्यातील ४, पाटण तालुक्यातील ७, माण तालुक्यातील ५, खंडाळा तालुक्यातील ९ अशा एकूण १२२ गावांचा समावेश आहे. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असेही जिल्हा पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.