फलटण : श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, शेती शाळा, जिंती नका, फलटण येथे गुरुवार दि. दोन जानेवारी ते सहा जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५’ चा शुभारंभ फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सदर उदघाटन समारंभास कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणचे चेअरमन व फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ फलटणचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, महाविद्यालय समितीचे उपाध्यक्ष
शरद रणवरे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदर कृषि प्रदर्शनाद्वारे कृषि क्षेत्रातील नवीन संशोधित व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. कृषि क्षेत्राशी निगडित दोनशेहून अधिक कृषि निविष्ठा कंपन्यांचा सहभाग कृषि प्रदर्शनामध्ये होणार आहे. नामांकित ट्रॅक्टर कंपन्या, शेतीची अवजारे, सेंद्रिय शेती, पशू संवर्धन व संगोपन, डेरी, पोल्ट्री, पॉली हाऊस, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, बीज व रोपे, रोपवाटिका, जैविक तंत्रज्ञान, कृषि उपयोगी पुस्तके, कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान यांची माहिती प्रदर्शनात एकाच ठिकाणी मिळणार आहे. या कृषि प्रदर्शना दरम्यान विविध विषयांवर चर्चा सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे, त्या मध्ये शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, भरड धान्याचे महत्व, कृषि उद्योजकता विकास, दुग्ध व्यवसाय आदी विषयांचा समावेश असणार आहे. तरी फलटण तालुका व परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.