फलटण : फसवणूक झालेल्या अथवा नाडवल्या गेलेल्या ग्राहकाला आपला अधिकार मिळवून देणे व ग्राहकांमध्ये आपले अधिकार व हक्क याबाबत जागरूगता निर्माण करण्यात ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या संघटना व कार्यकर्ते यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. फलटण तालुक्यातील ग्राहक संघटनांचे काम जिल्ह्यात भुषणावह आहे असे प्रतिपादन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले.
फलटण येथील तहसीलदार कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन कांबळे, पुरवठा निरीक्षक अश्विनी पोहरे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा संघटक किरण बोळे, अखिल भारतीय ग्राहक संघटनेचे स. रा. मोहिते, वैभव जगताप, ग्राहक राजा संघटनेचे तालुका संघटक प्रा. सतीश जंगम, फलटणचे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अक्षय खोमणे, फलटण बस आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक राहूल वाघमोडे, फलटण तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सिराजभाई शेख, भाजपाचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
शासनाने पूर्वीच्या ग्राहक संरक्षण कायद्यात विविध सुधारणा करून जरी तो अधिक बळकट केला असला तरी, आजही समाजात या कायद्याविषयी म्हणावी तशी जागरूकता नाही हि खेदजनक बाब असल्याचे नमूद करून डॉ. जाधव म्हणाले, कोणत्याही प्रकारची खरेदी करीत असताना अथवा सेवेचा लाभ घेत असताना जर फसवणूक टाळायची असेल तर या कायद्याविषयी आपणास मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. फलटण तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ग्राहक संघटनांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्राहकांचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील असा विश्वासही डॉ. अभिजित जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी प्रा. सतीश जंगम, किरण बोळे, स. रा. मोहिते, तानाजी सोडमिसे, किसन ढेकळे आदींनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास विविध ग्राहक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रास्त भाव दुकानदार, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.