‘आपली फलटण मॅरेथॉन’ ला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद : सुमारे तेराशे जणांचा सहभाग ; तीनशेहून अधिक जेष्ठ नागरिकांची नाव नोंदणी

फलटण : जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण आणि रोबोटिक्स सेंटर, फलटण यांच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन दि. ५ जानेवारी रोजी करण्यात येत असून यावर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सुमारे १३०० वर स्पर्धकांनी नाव नोंदणी केली असून त्यामध्ये वृद्धांची संख्या सुमारे ३०० हुन अधिक असल्याचे डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सांगितले आहे.
गेली सात वर्षे प्रतिवर्षी आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत असून प्रत्येक वर्षी लोकांचा उत्साह वाढतच असल्याचे निदर्शनास आणून देत लोकांना व्यायामाची सवय लागावी, सगळ्यांचे आरोग्य उत्तम रहावे या शुद्ध हेतूनेच आपण, ही मॅरेथॉन सुरु केली आहे. त्यामध्ये विविध वयोगटातील स्त्री – पुरुष, वृद्ध आणि तरुणांचा वाढता सहभाग समाधान देणारा असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी आवर्जून सांगितले.
आपली फलटण मॅरेथॉनचे बक्षीस वितरण आणि उपस्थितांना मार्गदर्शन असा दुहेरी उद्देश ठेवून प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आतापर्यंत निमंत्रित करण्यात आले असल्याचे निदर्शनास आणून देत यावर्षी प्रख्यात अभिनेता, नाटककार, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, बिग बॉस फेम आणि सेलिब्रिटी महेश मांजरेकर यांना बक्षीस वितरण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.
रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सजाई गार्डन कार्यालय, विमानतळ, फलटण येथून सुरु होणाऱ्या ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२४ – २५’ चा शुभारंभ महेश मांजरेकर व अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
आपली फलटण मॅरेथॉन मध्ये एकूण ३ विभागातील सहभागी स्पर्धकांपैकी पुरुष व महिला असे प्रत्येकी पाहिले ३ क्रमांकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत. एकूण १८ बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिले बक्षीस १० हजार रुपये,
दुसरे बक्षीस ७ हजार रुपये,
तिसरे बक्षीस ५ हजार रुपये असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.
मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्यांना आकर्षक फिनिशर मेडल तसेच मॅरेथॉन मध्ये सहभागी रनर्सना प्रत्येकी एक मॅरेथॉन किट दिले जाणार आहे, ज्या मध्ये टाईम चीप बिब, टी शर्ट, एनर्जी बार, टोपी आणि एक उत्तम भेट वस्तू असणार आहे.
स्पर्धेतील सहभागासाठी नाव नोंदणी केलेल्या सर्वांनी दि. २, ३ व ४ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मॅरेथॉनचे किट जोशी हॉस्पिटल, फलटण येथून घेऊन जावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
या वर्षी जोश पूर्ण या १८ ते ३० वयोगटात २५०, सळसळती तरुणाई या ३१ ते ४५ वयोगटात २५०, प्रगल्भ प्रौढ या ४६ ते ६४ वयोगटात २५० आणि अनुभवी ज्येष्ठ या ६५ वर्षांवरील वयोगटात ३०० वृध्द स्त्री – पुरुषांनी नाव नोंदणी केली असल्याचे डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सांगितले.
४६ ते ६४ वयोगटातील स्पर्धकांसाठी ५ कि. मी., ३१ ते ४५ वयोगटातील स्पर्धाकांसाठी १० कि. मी., १८ ते ३० वयोगटातील स्पर्धकांसाठी १५ कि. मी. आणि ६५ वर्षांवरील स्पर्धकांसाठी केवळ ३ कि. मी. अंतराची मॅरेथॉन आयोजित करण्यात येत आहे.
रोबोटीक्स यंत्रणेद्वारे गुडघ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या ३०० जणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून त्यांचेसाठी केवळ एक कि. मी. अंतरातील वाकेथॉनचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
स्पर्धेतील सहभागासाठी नाव नोंदणी केलेल्या सर्वांनी दि. २, ३ व ४ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मॅरेथॉनचे किट जोशी हॉस्पिटल, फलटण येथून घेऊन जावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!