फलटण : विधानसभा निवडणूक २०२४ ची मतदान प्रक्रिया सातारा जिल्ह्यातील आठही मतदार संघामध्ये आज शांततेत पार पडली. जिल्ह्यात सरासरी अंदाजे सत्तर टक्क्या पेक्षा जास्त मतदान झाले. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत या वर्षी सर्वात जास्त मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
संपूर्ण जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल, मतदान केंद्रांवर पुरविण्यात आलेल्या सोयी सुविधांबद्दल मतदरांनी समाधान व्यक्त केले. मतदानाचा टक्का वाढावा, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी प्रशासनाने अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध जय्यत तयारी केली होती. ज्या ठिकाणी मतदानासाठी प्रलोभनांचा वापर केला जावू शकतो अशी शक्यता असणाऱ्या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात आली. कोणत्याही मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले गेल्याने मतदान करता आले नाही असा प्रकार जिल्ह्यात कोठेही घडला नाही. एकूणच सातारा जिल्ह्यातील आठही मतदार संघांमध्ये अत्यंत शांततेत शिस्तबद्धरितीने व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली, याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे व नागरिकांचे आभार मानले.
पोलींग पार्टी बाबतीचा आत्तापर्यंतचा अनुभव बऱ्याचदा कष्टदायक असतो. यावेळी पहिल्यांदाच पोलींग पार्टीजची अत्यंत काळजी घेण्यात आली होती. साहित्य ताब्यात घेण्यापासून जमा करण्यापर्यंत सर्वच बाबींमध्ये काळजी घेण्यात आली होती. पोलींग पार्टीजला खूप वेळ उभे रहावे लागू नये अशा पद्धतीने साहित्य वितरणाचे नियोजन करण्यात आले होते. पोलींग पार्टीजच्या बसण्याची, नाष्ट्याची अन्य अनुषंगिक सुविधांची संपूर्ण काळजी घेण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस आणि महसूल प्रशासनामध्ये अतिशय उत्तम समन्वय दिसून आला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ज्येष्ठ मतदारांनी स्वत: मतदान केंद्रावर जावून मतदान करण्यासाठी पसंती दिली. वृद्ध, दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर, बैठक व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कोणत्याही ठिकाणी मतदारांना लांबच लांब रांगामध्ये ताटकळ उभे रहावे लागले नाही. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी मतदान केंद्रावर उत्साहवर्धक वातावरण ठेवण्यासाठी सखी मतदान केंद्र, गुलाबी मतदान केंद्र, बांबु मतदान केंद्र, जय जवान मतदान केंद्र, फळांचे गाव अशा वेगवेगळ्या थिमवर मतदान केंद्रे सजविण्यात आली होती. सर्वच मतदान केंद्रांच्या बाहेर आकर्षक रांगोळी व सजावट करुन, अनेक ठिकाणी गुलाब पुष्प देवून मतदारांचे स्वागत करण्यात येत होते. एकूण सातारा जिल्ह्याने लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला.
सातारा जिल्ह्यातील आठही मतदार संघांमध्ये अत्यंत शांततेत शिस्तबद्धरितीने व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. नागरिकांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. संपूर्ण यंत्रणेने दक्ष राहून अत्यंत परिश्रमपूर्वक मतदान प्रक्रिया पार पाडली. याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे व नागरिकांचे आभार मानले.