फलटण : शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर झाला आहे. शेतकऱ्यांनी जर शेतीमध्ये सेंद्रिय खतांना प्राधान्य दिले तर जमिनीचा पोत निश्चितपणे वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन विषमुक्त शेत मालाचे उत्पादन घ्यावे असे आवाहन फलटणचे प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
पाच डिसेंबर या जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून सासकल ता. फलटण येथे सचिन ढोले यांच्या हस्ते शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुहास रणसिंग, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, विडणी मंडल कृषी अधिकारी शहाजी शिंदे, कृषी पर्यवेक्षक अजित सोनवलकर, कृषी सहाय्यक सचिन जाधव यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी सेंद्रिय खतांचा वापर केला जात असलेल्या फळबागांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचबरोबर बबन मुळीक यांच्या फळ बागेतील सिताफळ तोडणीचा प्रारंभ ढोले यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांनी जागतिक मृदा दिन प्रतिज्ञा घेतल्यानंतर सचिन ढोले व अन्य मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास मोहन मुळीक, मनोहर मुळीक, ज्ञानदेव मुळीक, मुरलीधर मुळीक, संजय चांगण, विकास मुळीक, सत्यवान मुळीक, संपत मुळीक, भीमराव घोरपडे आदी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.