डॉ. महेश बर्वे लिखित ‘निरगाठ’ पुस्तकाचे संजीवराजे यांच्या हस्ते प्रकाशन

कोळकी : डॉ.महेश बर्वे यांनी वृक्षारोपण मोहिम हातात घेवून पर्यावरणाचा र्‍हास रोखण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे आपल्या खांद्यावर घेतली; त्याच पद्धतीने लिखाणाचाही ध्यास त्यांनी घेतलेला आहे. फलटणमधील बर्वे कुटूंबामध्ये सर्वाधिक डॉक्टर आहेत. त्यांच्यामधून लेखक म्हणून पुढे येणारे एकमेव डॉ.महेश बर्वे हेच आहेत. उत्तम वैद्यकीय सेवा देताना वेगळे विचार डोक्यात येणं आणि ते कागदावर लिहून पुस्तक रुपात प्रकाशित करणं ही वेगळी देणगी डॉ. महेश बर्वे यांना लाभली आहे, असे गौरवोद्गार फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
विद्यावैभव प्रकाशन निर्मित व डॉ.महेश बर्वे लिखित ’निरगाठ’ या पुस्तकाचे प्रकाशन फलटण येथे डॉ.जोशी हॉस्पिटलच्या सभागृहात संजीवराजे यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, निवृत्त प्राचार्य रवींद्र येवले, निलीमाताई दाते, बकुळ पराडकर, डॉ.महेश बर्वे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संजीवराजे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी बहुतेकदा आपल्याकडे भाषेला फारसे महत्त्व दिले जात नाही. कामचलावू भाषा वापरली जाते परंतु भाषा समृद्ध ठेवायची असेल तर ती शुद्ध असली पाहिजे आणि त्यासाठी वाचनाची सवय असणे गरजेचे आहे. वेगवेगळे विचार घेवून वेगळ्या प्रकारचं लिखाण डॉ.महेश बर्वे यांनी केलं आहे. त्यांच हे लिखाण वाचकांना नक्कीच आवडेल असा विश्‍वासही संजीवराजे यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ.महेश बर्वे यांनी ‘निरगाठ’ या पुस्तकात आपल्या सूक्ष्म दृष्टीतून सोप्या भाषेत वेगवेगळे पाठ लिहिले आहेत. त्यांच्या वेगळ्या रचनेतले विचार वाचून आपल्याला वेगळे बळ मिळते असे प्रा. रवींद्र येवले यावेळी म्हणाले तर डॉ.महेश बर्वे हे वृक्षारोपण व संवर्धनातून पर्यावरण रक्षणाचे काम करत असतात. लेखक म्हणून विविध अनुभवांना पुस्तक रुपातून त्यांनी शब्दबद्ध केले आहे असे निलीमा दाते यांनी सांगितले. निष्णात डॉक्टर, निसर्गप्रेमी, टेनिसपट्टू, फोटोग्राफर व लेखक असे विविध पैलू डॉ. महेश बर्वे यांचे आहेत. साधे विषय घेवून विस्तृतपणे लिखाण करुन दृढ गाभा देण्याचं काम ते करीत असतात. ‘निरगाठ’ हे पुस्तक वाचकांसाठी वाचनीय आणि विचार करायला लावणारे आहे असे प्रतिपादन डॉ. प्रसाद जोशी यांनी यावेळी केले.
वैद्यकीय अभ्यासानुसार गाठ येणं म्हणजे घाबरण आलं पण ‘निरगाठ’ मध्ये घाबरण्यासारखा उहापोह अजिबात नाही. साधक बाधक विचारांना एकत्र विणून त्यांना पुस्तक रुपात आणलं आहे. वैचारिक गाठी मेंदूला बसल्या आहेत त्यातल्या काही ‘निरगाठी’ वाचकांकडून सोडवून घेण्याचा हा प्रयत्न आहे, असे डॉ.महेश बर्वे यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन बकुळ पराडकर यांनी केले. आभार डॉ. सौ. प्राची बर्वे यांनी मानले. सौ. शुभांगी बोबडे यांनी कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने तर समारोप पसायदानाने केला.
कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे फलटण शाखा अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, डॉ. जे. टी. पोळ, डॉ. संजय राऊत, डॉ. किरण नाळे, डॉ. सचिन गोसावी, प्रा. विक्रम आपटे, अ‍ॅड. विजय नेवसे, साहित्यिक सुरेश शिंदे, दिलीप जाधव, धनुभाऊ जाधव, अनिल तेली आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!