फलटण : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार फलटण येथे ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच पुणे येथे पार पडली. या बैठकीत
दिनांक ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. त्याचाच भाग म्हणून फलटण या ठिकाणी ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा पूर्व विभागाचे अध्यक्ष भीमराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली. फलटणसह माण, खटाव, कोरेगाव आणि खंडाळा या तालुक्यातही सदर मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा पूर्व उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, फुले,शाहू, आंबेडकर विद्वत महासभा तालुका अध्यक्ष आनंद निकाळजे, तालुका अध्यक्ष संदीप काकडे, फलटण शहर अध्यक्ष उमेश कांबळे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष चित्राताई गायकवाड, जिल्हा महासचिव अरविंद आढाव आदी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.