फलटणचा रथोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न ; श्रीराम, सीतामातेची रथातून नगर प्रदक्षिणा

फलटण : संस्थान काळापासून सुरु असलेली व ऐतिहासिक महत्त्व असणारी फलटण येथील राम यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत परंपरागत पद्धतीने व मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी नगर प्रदक्षिणेला निघालेल्या राम रथाचे फलटण शहर व तालुक्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांनी मनोभावे दर्शन घेतले.
सोमवार दि. २ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता राजघराण्यातील संजीवराजे नाईक निंबाळकर, सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, सत्यजीराजे नाईक निंबाळकर, सौ. मिथिलाराजे नाईक निंबाळकर, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर आदींनी राम मंदिरात प्रभू श्रीराम व सीता मातेच्या मूर्तींचे दर्शन घेतल्यानंतर मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आल्या. त्यावेळी तेथे माजी आमदार दिपकराव चव्हाण व तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आदी मान्यवरांनी प्रभू श्रीराम, सीतामातेचे दर्शन घेतल्यानंतर श्रीराम मंदिरापासून परंपरागत मार्गाने रथ नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला.

रथप्रदक्षिणेच्या मार्गावर ठीक ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या राम भक्तांनी मनोभावे राम रथाचे दर्शन घेतले, या भाविकांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. शहरवासीयांनी रथ मार्गावर सडा रांगोळ्या घालून राम रथाचे स्वागत केले. फलटण शहरातील परंपरागत मार्गावरून नगर प्रदक्षिणा पूर्ण करून रामरथ रात्री नऊच्या सुमारास पुन्हा श्रीराम मंदिरात पोहोचला.
रथ यात्रेनिमित्त बुधवार दि. २७ नोव्हेंबर ते रविवार दि. १ डिसेंबर अखेर मंदिरात दररोज रात्री ९ ते ११ यावेळेत प्रभावळ, अंबारी, शेष, गरुड व मारुती ही वाहने काढण्यात आली, ती पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी अबालवृद्ध भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
देवदिवाळी निमित्त मंदिरातील दोन्ही दगडी दीपमाळावर दिवे प्रज्वलित करण्यात आले होते, तर श्रीराम मंदिर आणि शेजारच्या मुधोजी मनमोहन राजवाड्यावर वीज दिव्यांची मनमोहक आरास करण्यात आली होती.

श्रीराम रथोत्सवाच्या निमित्ताने फलटण येथे सुमारे आठ ते दहा दिवस मोठी यात्रा भरत असते. या यात्रेत स्थानिकांसह बाहेर गावावरून आलेल्या व्यापाऱ्यांनीही विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर लहान मुलांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले उंच उंच पाळणे, रेल्वे, फिरती चक्रे, विविध प्रकारची करमणुकीची साधने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवल्याने रथ नगर प्रदक्षिणा शांततेत व सुरळीत पार पडली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!