रामयात्रेतील फाळकूट दादा, रोड रोमियो, वसुली भाई व भुरटे चोर यांच्या मुसक्या पोलिस आवळणार का ; नागरिकांचा सवाल

फलटण : फलटण शहरवासियांचे ग्रामदैवत श्रीराम यात्रेत बाहेर गावावरून आलेले दुकानदार, रथ पाळनेवाले व फिरस्ते यांना व सायंकाळी यात्रेत अथवा रथ पाळणे परिसरात फिरणाऱ्या मुली, महिला व जेष्ठ नागरिक यांना वेठीला धरणाऱ्या फाळकूट दादा, रोड रोमियो, वसुली भाई व भुरटे चोर यांच्या पासून संरक्षण देण्याचे आव्हान फलटण पोलीस प्रशासनासमोर ठाकले असून राम यात्रेसह फलटणच्या नावलौकिकास बाधा आणणाऱ्या अशा अपप्रवृत्तींच्या मुसक्या पोलीस आवळणार का याकडे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नाईक निंबाळकर या राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी फलटणला रथ यात्रेची परंपरा सुरु केली त्यास आज अडीचशे वर्षापेक्षाही जास्त कालावधी लोटला आहे. फलटणच्या रामरथ यात्रेस एक ऐतिहासिक परंपरा व महत्व आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच देवदिवाळी दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथामधून नगर प्रदक्षणा होते. राम यात्रेच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात किमान आठ दिवस आगोदर पासून बाहेर गावातील व्यावसायीक लहान मुलांच्या खेळण्यासह विविध प्रकारची दुकाने थाटतात. रामयात्रेनंतरही किमान आठवडाभर ही दुकाने फलटण शहरात असतात. त्याच बरोबर या यात्रेत अबालवृद्धाचे प्रमुख आकर्षनाचे केंद्रबिंदू असणारे विविध प्रकारचे पाळणे वेगवेगळ्या जागी उभारतात. रामयात्रा व त्यानंतरच्या आठवडाभरात फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पृथ्वी चौक, महावीर स्तंभ ते गजानन चौक, रिंग रोड आदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन व बाहेरून आलेल्या दुकानदारांना काही माथेफिरुंकडून वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहेत. या दुकानदारांना, फिरस्त्यांना दमदाटी करने त्यांच्याकडून घेतलेल्या वस्तूंचे पैसे न देणे, त्यांना दमदाटी करून वसुली करने, त्यांच्या वस्तूंची चोरी करने, महिला दुकानदारांशी असभ्य वर्तन करने असे प्रकार होत असतात. त्याच बरोबर रथ पाळने असलेल्या परिसरात वावरणारे रोडरोमियो, फाळकूट दादा, पैसे न देणारे फुकटचंबू, भुरटे चोर, मुली व महिला यांच्या मागे कर्णकर्कश्य पिपान्या वाजवत फिरणारे टोळके, गर्दीतून वेगाने वाहने चालवीने अशा विविध प्रकारच्या अपप्रवृत्तीना लगाम घालून बाहेरील व्यावसायीक व अबालवृद्धाना दिलासा देण्याचे काम पोलीस प्रशासनाला करावे लागणार आहे. फलटण शहरात राम यात्रेच्या निमित्ताने बाहेरून आलेल्या व्यवसायीकांना परवानगी देत असतानाच नगरपरिषद त्यांच्याकडून व्यवसाय कर आकारते. त्यामुळे अशा बाहेरील व स्थानिक व्यावसायीकांना संरक्षण मिळणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनमधून व्यक्त होत आहेत.

त्या वसुली भाईवर कारवाई होणार का ?

रामयात्रेत शहरा बाहेरून आलेल्या दुकानदारांकडून आम्ही फलटण नगर पालिकेची माणसं आहोत, तुम्हाला कर द्यावा लागेल असे सांगत त्यांच्याकडून काही वसुली भाई वसुली करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जर अशी वसुली कोण करत असेल तर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान पोलीस प्रशासना समोर आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!