फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघात आज एकूण चौदा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया बंद झाल्यानंतर अंतिम आकडेवारीनुसार एकूण ७१.०५ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत एकूण दोन लाख ४१ हजार ४३० एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये एक लाख १५ हजार ८१ पुरुष व एक लाख २६ हजार ३४१ महिला व आठ तृतीय पंथीय मतदारांचा समावेश आहे. आता अनेकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.
फलटण विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण चौदा मतदार रिंगणात असले तरी सुरुवातीस चौरंगी भासणारी ही निवडणूक अखेरच्या टप्प्यात तिरंगी बनली होती. त्यामुळे येथील निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी सकाळी दहाच्या सुमारास मुधोजी क्लब येथे मतदान केले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी जि. प. सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निंभोरे येथे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी येथे, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सुरवडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी तरडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार सचिन पाटील यांनी फलटण येथे, प्रा. रमेश आढाव यांनी गुणवरे येथे, माजी पंचायत समिती सदस्या जयश्री आगवणे यांनी गिरवी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
फलटण विधानसभा मतदार संघात एकूण तीन लाख ३९ हजार ६६२ एवढे मतदान असून त्यामध्ये एक लाख ७२ हजार ९४० पुरुष, एक लाख ६६ हजार ७०८ महिला व १४ तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाल्यावर सकाळी नऊ वाजेपर्यंत ४.२९ टक्के मतदान झाले होते, त्यानंतर सकाळी अकरा वाजेपर्यंत १७.९८ टक्के, दुपारी एक पर्यंत ३३.८१ टक्के, तीन वाजेपर्यंत ४८.४१ टक्के व सायंकाळी पाच वाजता ६३ टक्के मतदान झाले होते.
फलटण विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी सचिन ढोले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रदीप शेडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने चोख नियोजन केले होते. मतदार संघातील शहरी भागातील ४७ आणि ग्रामीण भागातील ३०८ अशा एकूण ३५५ मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, प्रथमोपचार यंत्रणा, सुरळीत विद्युत पुरवठा, परिसर स्वच्छता, आवश्यक असेल त्या मतदारांना रिक्षा, व्हीलचेअर अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. एकूण मतदान केंद्रांपैकी २३० मतदान केंद्रांवर सी.सी.टीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले होते. शहर व तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपअधिक्षक राहूल धस, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.