फलटणकरांनो महायुती किंवा महाविकास आघाडीला मतदान करू नका ; दिगंबर आगवणे यांनाच विजयी करा – महादेव जानकर

फलटण : भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांची नियत आणि नीती चांगली नाही. आरक्षणाच्या नावाखाली त्यांनी समाजा समाजामध्ये भांडण लावायच काम केले आहे. हे दोन्ही पक्ष अजिबात आरक्षण देणार नाहीत, हे जनतेने ध्यानात घ्यावे. जोपर्यंत भाजप आणि काँग्रेसची सत्ता या देशात आहे, तोपर्यंत कोणालाही आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे भाजपला व त्यांच्या महायुतीला तसेच काँग्रेसला व काँग्रेसच्या महाविकास आघाडीला मत देऊ नका ते दोघेही आपले नाहीत. म्हणूनच शिट्टी ला मतदान करून दिगंबर आगवणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील रासपचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ फलटण येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, रासपचे मुख्य महासचिव माऊली नाना सरगर, पश्चिम महाराष्ट्राचे युवा आघाडीचे अध्यक्ष अजित पाटील, भाऊसाहेब वाघ, फलटण पंचायत समितीच्या माजी सदस्या जयश्री आगवणे, जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ज्या भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही युती केली त्यांनी आम्हाला धोका दिला. आम्हाला दोन जागा देऊन त्यांनी त्या दोन्ही जागांवरती कमळाचे उमेदवार उभे केले. तुम्ही मला नडलात आता मी तुम्हाला नडणार आहे. आम्ही होतो म्हणून तुम्ही सत्तेत होता आता आम्ही तुमच्याबरोबर नाही त्यामुळे तुम्ही सत्तेमध्ये राहणार नाही असा इशारा देत जानकर म्हणाले, दहा वर्षे भाजपात गेल्यामुळे आम्ही कुजलो, सडलो आणि आमचा पक्ष छोटा झाला ही व्यथा आहे. परंतु तरीही मी स्वतःच्या पक्षाचे चित्र तयार केलं आणि त्यावर चार आमदार निवडून आणले. गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटकात नगरपालिका ताब्यात घेतल्या, परंतु सातारा जिल्ह्याने मला साथ दिली नाही, पाहिजे तसं प्रेम केलं नाही याच आपल्याला शल्य आहे. मी भाजप अथवा काँग्रेसचा चमचा नाही राष्ट्रवादीचा दलाल नाही म्हणूनच मी माझ्या पक्षाचा झेंडा घेऊन स्वाभिमानाने तुमच्या समोर उभा असल्याचे सांगत
‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी’ द्यायची असेल तर त्यासाठी महात्मा फुले यांच्या विचारांचा राष्ट्रीय समाज पक्ष दिल्लीत आणि राज्यात सत्तेत पाहिजे असे ही ते यावेळी म्हणाले.

फलटणकरांसाठी एक चांगली संधी..!

फलटण तालुक्यातली घराणेशाही आता जास्त काळ टिकणार नाही. फलटणकरांसाठी एक चांगली संधी चालून आलेली आहे दोन्ही निंबाळकरांच्या जाचातून बाहेर पडायचे असेल तर शिट्टीला मतदान करून दिगंबर आगवणे यांना आमदार करा असे आवाहन करून राष्ट्रीय समाज पक्ष हा महाविकास आघाडी अथवा महायुती यापैकी कुणाही बरोबर नसून आमचा बाणा हा लाचारीचा नसून स्वाभिमानाचा आहे असे जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर फलटण ला कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देऊ..!

उद्याच सरकार बनवताना त्यांना महादेव जानकर यांची गरज नक्की लागणार. या विधानसभा निवडणुकीत आमचे पंचवीस आमदार निवडून आले व सरकार स्थापनेमध्ये पाठिंबा देण्याची वेळ आली तर फलटणला कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळालेल असेल, आणि जर आणखीन जास्त आमदार आले तर कदाचित गृहमंत्री सुद्धा आपल्याकडे मागून घेईल व ते जर मिळाले तर ते सुद्धा फलटणकरांना देऊन टाकीन असा शब्दही महादेव जानकर यांनी यावेळी फलटणच्या जनतेला दिला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!