प्रा. रमेश आढाव यांना वाढता पाठिंबा ! सोयीस्कर राजकीय कोलांटउड्या मारणारांना मिळणार धडा !

फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून संविधान समर्थन समिती पुरस्कृत परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार प्रा. रमेश आढाव यांना फलटण शहरासह, ग्रामीण भागातील जनतेमधुनही वाढता पाठिंबा मिळू लागल्याचे चित्र असून निष्कलंक व सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी असणारा उमेदवार म्हणून त्यांची प्रतिमा पुढे येवू लागली आहे.
छ. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र स्वराज पक्ष, मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा उभारणारी राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र भारत पक्ष, शंकरआण्णा धोंडगे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य समिती, नारायण अंकुशे यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय जवान किसान पार्टी या सर्व राज्य पातळीवर काम करणाऱ्या पक्षांच्या परिवर्तन महाशक्ती आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून व संविधान समर्थन समितीच्या पाठिंब्यावर प्रा. रमेश आढाव हे रोडरोलर या निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील घटक, चळवळीचा पिंड असणारा चळवळीतील कार्यकर्ता, समाजातील प्रश्न पोटतिडकीने मांडणारा पत्रकार, अभ्यासू आणि प्रभावी वक्तृत्व असणारा वक्ता, अडचणीवर मार्ग दाखविणारा मार्गदर्शक, सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कायम आग्रही राहणारा व फुले,शाहू,आंबेडकर विचारधारेला मानणारा सामाजिक कार्यकर्ता अशी बहुआयामी ओळख असणारे व सर्वसामान्यांना केव्हाही सहजपणे संपर्क साधता येऊ शकणारे व आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रा. रमेश आढाव हे फलटण तालुक्यात सर्वपरिचित आहेत.


विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये एकीकडे सध्या सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष, इतर छोटे मोठे पक्ष व अपक्ष यांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. भेटीगाठी, कोपरा सभा, घोंगडी सभा, पदयात्रा व सभा ठिकठिकाणी होत आहेत. प्रस्थापितांकडून मुक्तपणे अश्वासनांची खैरात वाटली जात असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे या मतदार संघातील सर्व सामान्य जनतेने मात्र सावध पवित्रा घेतला असल्याचे दिसून येत आहे. विकासाच्या नावाखाली लोकप्रतिनिधिंनी मारलेल्या सोयीस्कर राजकीय कोलांटउड्या जनतेला रुचलेल्या नाहीत हे ठिकठिकाणाहून व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे. नेतेच जर आपली निष्ठा, तत्त्व बदलत असतील तर सामान्य जनतेने सुद्धा का बदलू नये ? असा सवाल व्यक्त होत असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत अन्य उमेदवारांप्रमाणे प्रा.रमेश आढाव यांनीही प्रचारात मुसंडी मारली असून त्यांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळताना दिसू लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ऊस व दूध उत्पादक शेतकरीही जोमाने त्यांचा प्रचार करत आहेत

एकच निर्धार बौद्ध आमदार
फलटण कोरेगाव मतदार संघामध्ये अनुसूचित जातीमध्ये मोडणाऱ्या सर्व समाजाचे मतदान सुमारे चाळीस हजारांपेक्षाही जास्त आहे. या विधानसभा निवडणुकीत हा समाज एकवटलेला आहे. हा समाज कोणा प्रस्थापिताला पराभवाची धूळ चारू शकतो हे विसरून चालणार नसले तरी यंदा विजयाच्या निर्धारानेच हा समाज निवडणूक रिंगणात आहे. आमची मते चालतात मग आम्ही का नको या भूमिकेस समाजातील अन्य घटकातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत बौद्ध समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घेऊन प्रथमच परिवर्तन घडवण्याच्या निर्धाराने निवडणूक रिंगणात उतरला आहे व त्यांना दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!