फलटण : फलटणची तुलना बारामतीशी करताना बारामतीकरांकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पद किती वर्ष आहे हे त्यांनी पाहावे. रामराजे महायुतीमध्ये आहेत द्या त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद मग फलटणचा विकास कसा होत नाही ते बघू असा टोला मारत केवळ शरद पवार यांच्यावर मोहिते पाटील, नाईक निंबाळकर व इथल्या जनतेच प्रेम आहे. म्हणून आम्ही सर्वांनी तुम्हाला एवढे वर्ष सहन केले अशी टीका खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. त्याचबरोबर त्यांनी फलटणकरांनो तुम्हाला तुमचा आमदार शिक्षक हवा की वाईनशॉपवाला हवा असा सवाल ही केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ साखरवाडी ता. फलटण येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संजीवराजे नाईक निंबाळकर, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सह्याद्री कदम, नितीन शाहूराजे भोसले, भगवानराव होळकर, शंकरराव माडकर, राजाभाऊ भोसले, सतीश माने, महेंद्र सूर्यवंशी, रेश्माताई भोसले, शंभु खलाटे, सुधीर भोसले, विकास नाळे आदींची उपस्थिती होती.
ज्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील हे या राज्याचे उपमुख्यमंत्री होते व आर आर पाटील हे प्रदेशाध्यक्ष होते, याच कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेची सर्वात जास्त चांगली कामगिरी होती. त्यावेळी बहात्तर आमदार त्यावेळी निवडून आणले होते. परंतु जसा अजित पवार यांच्याकडे पवार साहेबांनी कारभार दिला आणि उलटी गिनती सुरु झाली. विरोधी पक्षाबरोबर भांडत बसण्यापेक्षा साहेबांचे जे निष्ठावंत होते त्यांच्याच पायात पाय घालायला त्यांनी सुरुवात केली. जिथे तिथे स्वतःचच पुढे पुढे करायला सुरुवात केली. त्यामुळे ते ग्रामपंचायतचे नेते आहेत का राज्याचे नेते आहेत हेच कळायला मार्ग नाही. त्यांनी विकासाऐवजी केवळ ओढा ओढीचे उद्योग केले आणि आता ते राज्याचे नेते व्हायला चालले आहेत अशी खरमरीत टीका अजित पवार यांच्यावर करून खा. मोहिते पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, दादासाहेब कोरे, शंकरराव मोहिते पाटील, श्रीमंत मालोजीराजे अशा मंडळींनी पश्चिम महाराष्ट्रात सहकार रुजवला. १९६०-७० च्या दशकात खाजगीकरणाच्या विरोधात जाऊन कारखानदारी उभी राहिली परंतु तुम्ही काय केल हे जनतेला माहित आहे.
श्रीराम कारखान्याच्या अनुषंगाने होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले, आमदार रामराजे यांनी हजार कोटींची ही मालमत्ता पन्नास कोटींमध्ये विकत तर घेतली नाही ना, त्यांनी श्रीराम चालवायला दिला आहे, तो विकला नाही. आजही श्रीराम शेतकऱ्यांच्याच मालकीचा आहे. चेअरमन व संचालक तेथे केवळ विश्वस्तांची भूमिका निभावत आहेत. अजित पवार यांनी साखरवाडीच्या सभेत खासदार मोहिते पाटलांवरही टीका केली होती त्यावर बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये माढा मतदार संघात अकलूजकर व फलटणकर यांची क्षमता काय आहे याचा अनुभव तुम्ही घेतला आहे. त्यामुळे त्याबाबत आम्ही काही सांगायची गरज नाही. परंतु आमची नातीगोती तिकडपण आहेत हे तुम्हीपण ध्यानात ठेवा.
तुतारी घेतलेल्या माणसा शेजारचे बटन दाबायच हा निर्णय फलटणकरांनी लोकसभेपूर्वीच घेतला आहे. आमदार दीपक चव्हाण हे पापभीरू व्यक्तिमत्व आहे. काम एके काम ही त्यांची पद्धत आहे. त्यामुळे आपला आमदार वाईनशॉपवाला पाहिजे की शिक्षक पाहिजे हे फलटणकरांनी ठरवायचे आहे. लोकसभेप्रमाणे याही निवडणुकीत पैशांचा पाऊस पडला जाईल, परंतु जर जनतेने चुकून त्यांना मते दिली तर तूम्हाला आम्ही टोपणावर विकत घेतले असे ते म्हणतील त्यामुळे तसे काही होऊ देऊ नका असे सांगत गेल्या वेळेस तीस हजारापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून दिलेल्या दीपक चव्हाण यांना यावेळी पन्नास हजाराचे मताधिक्य द्या व जनतेचा हिसका दाखवा असे आवाहन केले.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची आश्वासने
- शेतकऱ्यांच्या शेतमालाला व्यापक बाजारपेठ व बाजार भाव मिळावा यां दृष्टीने महत्वपूर्ण असणारी किसान रेल्वे सुरु करन्यासाठी प्रयत्नशील राहणार
- केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या योजनेच्या माध्यमातून फलटण येथे उत्तम दर्जाचे क्रीडा केंद्र उभे करणार
- फलटण येथे हॉकीचे सिंथेटीक कोर्ट बनवणार
- फलटण तालुक्यातील रेल्वेचे जेवढे प्रश्न आहेत ते लोकांशी चर्चा करून जाणून घेणार व त्यांची सोडवणूक करणार
- माझ्यावर दिलेली संसदेतली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडणार