फलटण : महाराष्ट्र राज्यात जेष्ठ नागरिकांसाठी वयाची अट साठ वर्षे आहे परंतु त्यांना शासनाच्या सुविधा मिळविण्यासाठी पासष्ठ वर्षे वयाची अट आहे, ही विसंगती का असा सवाल उपस्थित करून शासनाने जेष्ठ नागरिकांना देऊ केलेल्या सर्व सवलती पासष्ठ ऐवजी साठ वर्षांपासून लागू कराव्यात अशी मागणी निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केली आहे.
महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब टेकाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मुंबई येथील सानपाडा जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी बोलताना भुजबळ यांनी सदर मागणी केलीआहे.
आपल्या सत्काराला उत्तर देताना देवेंद्र भुजबळ यांनी केलेल्या सूचनेचा संदर्भ देऊन अण्णासाहेब टेकाळे म्हणाले, पासष्ठ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना लागू असणाऱ्या शासनाच्या सर्व सवलती साठ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना लागू करण्यात याव्यात या मागणीसह दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून दरमहा मिळणाऱ्या दीड हजार रुपयांच्या पेन्शनच्या रकमेत वाढ करून, ती तीन हजार रुपये करण्यात यावी, अशा मागण्या सरकारकडे करण्यात येतील. राज्यात सध्या एक कोटी ४० लाख जेष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी त्रेपन्न टक्के महिला आहेत तर सत्तेचाळीस टक्के पुरुष आहेत. एकूण जेष्ठ नागरिकांपैकी चाळीस लाखाहून अधिक जेष्ठ नागरिक दारिद्य्र रेषेखाली आहेत, त्यांना सरकारच्या वतीने दिड हजार रुपये मिळतात असे सांगत सर्व ग्रामपंचायती आणि महानगर पालिकांनी शासनाच्या धोरणानुसार जेष्ठ नागरिकांसाठी धडाडीने विरंगुळा केंद्रे उभारावीत असे आवाहन केले व राज्यात सर्वात जास्त बत्तीस विरंगुळा केंद्रे नवी मुंबईत असल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.
कार्यक्रमात सुरुवातीस सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मा. ना. कदम यांनी संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अण्णासाहेब टेकाळे यांचा विशेष सत्कार निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांनी केले. प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन सचिव शरद पाटिल यांनी केले. या वेळी सानपाडा नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.