फलटण : फलटण विधानसभा मतदार संघात अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजाची संख्या जास्त असूनही आजवर या समाजावर राजकीय अन्याय झाला आहे. एक जात अथवा धर्म म्हणजे राजकारण न्हवे याचे आम्हाला भान आहे. संविधान हे टिकलं पाहिजे त्याच संरक्षण झालं पाहिजे, त्यासाठी जे जे करावे लागेल ते ते आम्ही सगळं करू. स्वाभिमानी परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून आम्हाला जो न्याय मिळाला आहे त्यातच आमचा अर्धा विजय झाला आहे अशी प्रतिक्रिया संविधान समर्थन समिती पुरस्कृत परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार प्रा. रमेश आढाव यांनी व्यक्त केली आहे.
फलटण येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
फलटण विधानसभा मतदार संघ २००९ साली अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला. त्यानंतर २०१४ व २०१९ अशा सलग तिनही वेळा या मतदार संघात अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजाची मतदार संख्या जास्त असूनही या समाजातील कोणालातरी प्रतिनिधित्व मिळेल या अपेक्षेत आम्ही पंधरा वर्षे प्रतीक्षेत काढली. २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी सर्व जे प्रस्थापित व बलाढ्य पक्ष आहेत त्या पक्षाच्या नेत्यांना पक्ष प्रमुखांना आम्ही भेटलो व त्यांना विनंती केली की आमच्या समाजातील कोणालाही यावेळी संधी द्या. आमच्या समाजाला संधी मिळेल अशा अपेक्षेने आम्ही सर्व राजकीय नेतृत्वाच्या गाठीभेटी घेतल्या परंतु दुर्दैवाने त्याला यश मिळाले नाही. परंतु आम्ही आमचा प्रयत्न नेटाने सुरूच ठेवला अखेर छ. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र स्वराज पक्ष, मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा उभारणारी राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र भारत पक्ष, शंकरआण्णा धोंडगे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य समिती, नारायण अंकुशे यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय जवान किसन पार्टी या सर्व राज्य पातळीवर काम करणाऱ्या पक्षांच्या परिवर्तन महाशक्ती आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी मिळाली असे स्पष्ट करून प्रा. रमेश आढाव म्हणाले, आमच्या समाजाला कुणीही न्याय दिला नाही परंतु परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून आम्हाला जो न्याय मिळाला आहे, तो आमचा अर्धा विजय आहे, आणि ही आघाडी निश्चितपणे फलटण तालुक्यात परिवर्तन घडवेल.
निवडून येणे, प्रतिनिधित्व करने, राजकारण करने हा आपला हेतू नाही. परंतु शेतकरी व तळागाळातील घटकांच्या दृष्टीने ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत, त्यांना आपण प्रधान्यक्रम देणार आहे. या हेतूनेच एक गरीब घरातील झोपडीतील मुलगा बलाढ्य शक्तींशी लढायला पुढे आला आहे.
आमच्या समाजावरती जो राजकीय अन्याय झालेला आहे. त्या अन्यायला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, यश मिळायला पाहिजे ही त्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे. एक जात किंवा एक धर्म म्हणजे राजकारण न्हवे. राजकारणाच्या अथवा सत्तेच्या लढाईमध्ये सर्व धर्म समभाव किंवा सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आल्या शिवाय राजकीय यश मिळू शकत नाही याचेही भान आम्हाला आहे. आणि त्या दिशेने गेली वर्षभर आम्ही पाऊले टाकत आहोत. ज्याला आपण सोशल इंजिनीअरिंग म्हणतो तो माझ्या माध्यमातून पुरा झालेला आहे. आणि हेच माझे यश ठरणार आहे. आमचा समाज, पक्ष व सोशल इंजिनीअरिंगचा केलेला जो प्रयोग आहे तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करून आढाव यांनी सांगितले की, मी फार मोठ्या विकासाच्या गप्पा मारणार नाही. परंतु राज्यस्तरीय पक्षांच्या परिवर्तन महाशक्ती आघाडीतील सर्व घटक पक्षांचा जो अजेंडा आहे तो व आमच्या संविधान समर्थन समितीचा जो अजेंडा आहे हे दोन्ही अजेंडे राबविण्याला आपण प्राधान्य देणार आहोत. संविधान हे टिकलं पाहिजे त्याच संरक्षण झालं पाहिजे त्यासाठी जे जे करावे लागेल ते ते आम्ही सगळं करू.