फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात असलेल्या दिगंबर आगवणे यांना पाठबळ देऊन जनतेने त्यांना विजयाचा कौल द्यावा असे भावनिक आवाहन फलटण पंचायत समितीच्या माजी सदस्या जयश्री दिगंबर आगवणे यांनी मतदारांना केले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिगंबर आगवणे यांनी राष्ट्रीय समाज पक्ष व आम आदमी पार्टी यांच्यावतीने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना जयश्री आगवणे यांनी सदर आवाहन जनतेला केले आहे.
आमच्या संघर्ष काळामध्ये जनतेने दिलेला पाठिंबा व आशीर्वाद यावरती आम्ही खंबीरपणे वाटचाल केली आहे. या प्रतिकूल काळामध्ये अनेकांची साथ आम्हाला लाभली असे नमूद करून आगवणे म्हणाल्या, गेल्या बारा वर्षांमध्ये दिगंबर आगवणे यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेची जी सेवा केली आहे, सामाजिक कार्य केले आहे त्यांच्यावरील प्रेम जनता मतदानामधून व्यक्त करील व दिगंबर आगवणे हेच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. राष्ट्रीय समाज पक्ष व आम आदमी पार्टी यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार व्यक्त करून ही निवडणूक आता सर्वसामान्य जनतेने हातात घेतली असून जनता दिगंबर आगवणे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभी राहील व त्यांच्याच बाजूने विजयाचा कौल देईल असा विश्वासही जयश्री आगवणे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला आहे.