राष्ट्रवादी काँग्रेस मधून शक्ती प्रदर्शनाने सचिन कांबळे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
फलटण : फलटण कोरेगाव मतदार संघातून महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांनी आज (दि.२८) रोजी दिपावलीच्या पहिल्या दिवशी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन दादा एकत्र आल्याने फलटण तालुक्यात नवीन विकास पर्वाला सुरुवात झाली असल्याचे सचिन कांबळे-पाटील यांनी सांगितले.
महायुतीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपली उमेदवारी दाखल केल्या नंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व खासदार नितीन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, शिवसेनेचे नानासो इवरे यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या विचारांची महायुती आता फलटण तालुक्यात अधिक बळकट झाली आहे. खासदार नितीन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, डी. के पवार, बाळासाहेब सोळसकर व महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या नेतृत्वाखाली आपण महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने घड्याळ या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. फलटण तालुक्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी व राहिलेला अर्धवट विकास पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन दादा एकत्र आले आहेत, ते एकत्र आल्याने फलटण तालुक्यात नवीन विकास पर्वास व परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. आपणास भविष्यात फलटण तालुक्यात होऊ घातलेले परिवर्तन दिसू लागले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा व राष्ट्रवादीच्या घड्याळाचा विजय आता निश्चित आहे असेही सचिन कांबळे-पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी आपणास कोणता कानमंत्र दिला आहे का अशी विचारणा करताच सचिन कांबळे-पाटील म्हणाले, तुम्ही आता विकास कामात कुठेही कमी पडायचे नाही. तुमच्या मागे हवी तेवढी ताकद उभी करतो. जस बारामती आहे अगामी कळात फलटणचा ही विकास तश्याच पद्धतीने करू असा शब्दवजा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आपणाला दिला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी फलटण शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथून महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून कांबळे-पाटील यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर स्तंभ, क्रांतिवीर उमाजी नाईक, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले व श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याना अभिवादन करून ही रॅली अधिकार गृहाजवळ आली. यानंतर सचिन कांबळे-पाटील यांनी खासदार नितीन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर व बाळासाहेब सोळसकर यांच्या समवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान आज महायुतीच्या माध्यमातून कांबळे-पाटील यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनास समर्थकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे या गर्दीची चर्चा तालुक्यात सर्वत्र रंगली आहे.