फलटण : फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी सचिन कांबळे-पाटील यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना रंगणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत उभी फूट पडल्यानंतर विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांच्या समवेत संजीवराजे नाईक निंबाळकर व राजे गटाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे फलटणमधून उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणाची उमेदवारी निश्चित करणार याकडे अनेकांचे डोळे लागले होते. विधानसभेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे अद्याप अजित पवार यांच्याच पक्षात असले तरी त्यांनी महायुतीचा प्रचार करणार नसल्याचे या पूर्वीच जाहीर केले आहे. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर झालेले सचिन कांबळे-पाटील हे ओळखले जातात, शिवाय त्यांच्यावर भाजपने फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाची जबाबदारीही सोपवली आहे. त्यामुळे मूळ भाजपचे असले तरी कांबळे-पाटील आता राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या शिवाय ही विधानसभा निवडणूक दोन्ही नाईक निंबाळकरांच्या प्रतिष्ठेची असून कोण बाजी मारणार यावर आता चर्चा झडू लागली आहे.