शहरातला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर..!
फलटण : बँके बाहेर थांबलेल्या एक जणाच्या हातातील पिशवी हिसकावून नेत त्यातील एक लाख ४७ हजार रुपयांची रोकड व मोबाईल असा एकूण सुमारे एक लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ऐन सणासूदीच्या कालावधीत व वर्दळीच्या भागात हा प्रकार घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी, विनीत विठ्ठल शिंदे वय ३४ रा. शिंदेवाडी ता. फलटण यांचा बोअरवेलचा व्यवसाय आहे. दि. २५ ऑक्टोबर रोजी ते व त्यांच्याबरोबर काम करणारे कामगार सैल्य सडयन मुथ्थू हे वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या आयडीबीआय बँकेमध्ये पावणे बाराच्या सुमारास पैशांचा भरणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचा कामगार मुथ्थू यांच्याकडे कामगारांना पगार व बोनस देण्यासाठी एक लाख ४७ हजार रुपये रक्कम असलेली पिशवी देऊन त्यास बँके बाहेर असणाऱ्या सुरक्षा रक्षका जवळ बसण्यास सांगितले. त्या नंतर सुमारे दहा मिनिटांनी मुथ्थू हा बँकेत शिंदे यांच्याकडे घाबरलेल्या अवस्थेत पळत आला व त्याने जल्दी चलो, दो लडके पैसे लेके भाग गये असे सांगितले. यावेळी शिंदे तातडीने बँके बाहेर आले असता त्यांना काळ्या रंगाच्या मोटरसायकल वरून दोघेजण पळून जाताना दिसले. त्यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल ठरला. या चोरीत एक लाख ४७ हजार रुपयांची रोख रक्कम व पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.