काळज खून प्रकरणातील आठ संशयीत आरोपींना अटक ; दोन अल्पवयीन मुलांची सुधारगृहात रवानगी

फलटण : काळज ता. फलटण येथील खून प्रकरणाचा उलगडा चोवीस तासात करण्यात लोणंद पोलीसांना यश प्राप्त झाले आहे. या खून प्रकरणात दहा जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. दहा पैकी आठ संशयीत आरोपींना अटक केली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांची रवानगी बाल सुधारगृहात केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
रितेश राजेश मोहिते वय २१ रा. काळज, ता. फलटण, कृष्णा दीपक मोहिते वय २२, दीपक महादेव मोहिते वय ४७, ज्योती दीपक मोहिते वय ४४ तिघेही रा. नवी सांगवी, पुणे, मूळ रा. काळज ता. फलटण, यश बबन सोनवणे वय १८ रा. माळवाडी, हडपसर, पुणे, विशाल अशोक फडके वय २० रा. नवी सांगवी, पुणे, ओंकार किशोर खंडाळे वय १९, ऋषिकेश तीर्थराज सकट वय १९ दोघेही राहणार पिंपळे गुरव, पुणे अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की, दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी काळज ता. फलटण येथे सायंकाळी पावणे आठच्या सुमारास नितीन तकदीर मोहिते वय ४० रा. काळज ता. फलटण याची काळज गावातील लक्ष्मीदेवी मंदिरात निर्घृण हत्या करण्यात आली होती, हत्या करून हल्लेखोर तेथून पसार झाले होते. या खुनाचे कारण व हा खून कोणी केला याची उकल करणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी विविध प्रकारे माहिती घेऊन तपास केला असता, त्यामध्ये त्यांना सदर खून हा कृष्णा मोहिते व त्याचे साथीदार यांनी काळज येथील रितेश मोहिते व एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने कट रचून केला असल्याचे निष्पन्न झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये मयत नितीन मोहिते व शेजारी राहणाऱ्या विमल महादेव मोहिते यांच्यामध्ये घरामधील जागेच्या कारणावरून झालेला वाद या खुनास कारणीभूत असल्याचेही समोर आले आहे. नितीन मोहिते याने विमल मोहिते यांना धक्काबुक्की केली होती. परंतु सदर भांडण त्यांनी आपसात मिटिंग घेऊन गावपातळीवर मिटवलेही होते. विमल मोहिते यांचा मुलगा दीपक मोहिते याने त्याचा राग मनात ठेवला होता. त्यातूनच त्याने पत्नी ज्योती व मुलगा कृष्णा यांनी नितीन मोहिते यांच्या खुनाचा कट रचला. त्यानुसार त्यांनी काळज येथील रितेश मोहिते व अन्य एका अल्पवयीन मुलाची मदत घेऊन नितीन मोहिते यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते, तो लक्ष्मी देवी मंदिराच्या मंडपात बसल्याचे समजताच सायंकाळी पावणे आठच्या सुमारास कृष्णा मोहिते यांने त्याचे साथीदार विशाल फडके, ओंकार खंडाळे, ऋषिकेश सकट व अन्य एका अल्पवयीन मुलासह चार मोटरसायकलींवर येऊन नितीन मोहिते याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची हत्या केली. या खून प्रकरणातील आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. २७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे, तर अन्य दोन अल्पवयीन मुलांची सातारा येथील सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक
करण्याची चांगली कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी लोणंद पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व त्यांचे सहकारी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!