फलटण : येथील जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड व फलटण रोबोटिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘आपली फलटण मॅरेथॉन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले असून या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी यांनी केले आहे.
रविवार दिनांक पाच जानेवारी २०२५ रोजी सकाळी सहा वाजता या मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा अठरा ते तीस वयोगटातील महिला व पुरुषांसाठी जोश पूर्ण युवा गट, एकतीस ते पंचेचाळीस वयोगटातील महिला व पुरुषांसाठी सळसळती तरुणाई, सेहेचाळीस ते चौसष्ट वयोगटातील महिला व पुरुषांसाठी प्रगल्भ प्रौढ व पासष्ट वर्षापुढील महिला व पुरुषांसाठी अनुभवी ज्येष्ठ अशा चार विविध गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे अंतर अनुक्रमे पंधरा, दहा व पाच किलोमीटर असे असून ज्येष्ठ नागरिकांना तीन किलोमीटर अंतराची वॉकेथॉन पूर्ण करता येणार आहे. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला फिनिशर मेडल व ई सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेनंतर सकाळी साडेनऊ वाजता विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणी फी साडेसातशे रुपये ठेवण्यात आली आहे. पासष्ट वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना वॉकेथॉन स्पर्धेसाठी कोणतीही नोंदणी फी आकारण्यात येणार नाही. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना आकर्षक किट देण्यात येणार असून त्यामध्ये टी-शर्ट, रनर बीब, टोपी व आकर्षक भेटवस्तूचा समावेश असणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदणीसाठी वीस डिसेंबर अखेर www.joshihospitalpvtltd.com या बेबसाईडवर ऑनलाईन नाव नोंदणी करने आवश्यक आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धाकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जोशी हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले आहे.