
फलटण : योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन साधणारी जीवनशैली आहे असे प्रतिपादन सुवर्ण परीस स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण यांनी केले.
कुरवली ता. फलटण येथील वृद्धाश्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुवर्ण परीस स्पर्श फाउंडेशनच्यावतीने योग साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी फाउंडेशनचे व वृद्धाश्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शबाना पठाण म्हणाल्या, २०१५ सालापासून २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो. योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मन शांत राहते आणि आत्मविश्वासाला चालना मिळते. योग दिनापासून आपण सर्वांनी दैनंदिन जीवनात योगाला स्थान देण्याचा संकल्प करावा.
सुवर्ण परीस स्पर्श फाउंडेशन समाजोपयोगी उपक्रमांद्वारे नेहमीच गरजूंपर्यंत पोहोचते. वृद्धाश्रमात योग शिबिराचे आयोजन करून फाउंडेशनने खऱ्या अर्थाने समाजसेवेचे उदाहरण घालून दिले असल्याचे यावेळी निवृत्त प्राचार्य रवींद्र येवले यांनी सांगितले.
मंगलताई जाधव यांनी यावेळी योगाचे भारतीय परंपरेतील महत्त्व विशद करत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
या शिबिरात सुमारे पन्नास साधकांनी सहभाग घेत योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा उत्साहाने सराव केला. योग प्रशिक्षिका मयूरी शेवते यांनी
जेष्ठ नागरिकांकडून सोप्या योगासनांचे प्रात्यक्षिक करवून घेतले, ज्यामुळे सर्वांना आनंददायी अनुभव मिळाला.

