
फलटण : घरेलू काम काम करणाऱ्या महिलांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते. या महिलांना सामाजिक प्रतिष्ठा, शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्याबरोबरच शासकीय स्तरावर त्यांचे प्रलंबित असणारे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे व घरेलू कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देणे यासाठी समता घरेलू कामगार संघटना कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन संघटनेच्या अध्यक्षा कल्पना मोहिते यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फलटण शहरातील मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रसंगी सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, सानिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सुपर्णा अहिवळे, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा खरात, निवृत्त पोलीस उपअधिक्षक अनंत देशमुख, अनिसच्या तालुका सचिव मंदाकिनी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आयाज आतार, ॲड. रमेजा शेख आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
घरेलू कामगार संघटनेच्या महिला सदस्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर ज्या अडचणी येतात त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले यांनी यावेळी दिली.
इथे बसलेली प्रत्येक महिला ही रणरागिणी आहे. कायदेविषयक, समाजकारण व राजकारण अशा क्षेत्रात मी कार्यरत आहे. समता घरेलू संघटनेच्या सदस्यांना कायदेशीर मदत अथवा सल्ला हवा असल्यास आपण त्यासाठी सदैव तत्पर राहू, तसेच जर मला सर्वांनी संधी दिली तर आपण सर्वजण सामाजिक बांधिलकीमधून एक वेगळा इतिहास घडवू असे ॲड. कांचनकन्होजा खरात यावेळी म्हणाल्या.

कोणतेही काम कमी दर्जाचे नसते, त्यामुळे धुणे भांडी करण्याच्या कामाला कोणी कमी लेखता कामा नये. आज धुणे भांडी करणाऱ्या अनेक महिलांची मुले शासकीय सेवेमध्ये विविध विभागात चांगल्या पदावर कार्यरत आहेत, हे त्या महिलांच्या कष्टाचे फलित आहे आणि आपणा सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. महिला दिनाच्या औचित्याने महिलांसाठी आपण लवकरच एक चांगला कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सुपर्णा अहिवळे यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी संघटनेसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल सलमा शेख, अर्चना घोलप, शीतल मोहिते, अनिता गुंजाळ, सुनीता भिंगारे, दिक्षा कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर संघटनेच्या सदस्यांचेही सत्कार करण्यात आले.
उपस्थितांचे स्वागत दिक्षा कांबळे यांनी, सूत्रसंचालन स्वाती काकडे यांनी केले. आभार सपना चव्हाण यांनी मानले.
कार्यक्रमास पूजा देवकर, शोभा लष्कर, सोनाली अहिवळे, अर्चना अहिवळे, सपना साळवे, कल्पना सावंत, स्मिता पोतेकर, कमल हरिहर, आक्काताई कारंडे, कोमल देशमुख, भारती फडतरे, विनिता लोंढे, शीतल चोरमले आदींसह महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.