
फलटण : समाजामध्ये केवळ पोलीसच शांतता, सुव्यवस्था अथवा सामान्य नियंत्रण ठेवू शकत नाहीत, त्यासाठी नागरिकांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य आवश्यक असते. महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्याचा नावलौकिक शांतताप्रिय जिल्हा म्हणून आहे. अगामी काळातही तो तसाच अबाधित राहील असा विश्वास व्यक्त करून गेल्या तेहतीस वर्षांमध्ये माझ्याबरोबर पोलीस दलातील जे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान मला मिळालेल्या राष्ट्रपती पदकांमध्ये आहे असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा फलटण येथे भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, प्रतिभा शिंदे, डॉ. प्रसाद जोशी, दादासाहेब चोरमले, विलासराव नलवडे, बजरंग गावडे, भोजराज नाईक निंबाळकर, हणमंतराव सोनवलकर, पत्रकार अरविंद मेहता, रमेश आढाव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

मला मिळालेल्या राष्ट्रपती पदकाच्या निमित्ताने माझा सत्कार करावा अशी येथील नागरिकांची इच्छा होती. या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधता येईल, त्यांच्याशी काही हितगुज करता येईल याच उद्देशाने आज आपण फलटण येथे आलो आहोत. जरी मला राष्ट्रपती पदक मिळाले असले तरी गेल्या ३३ वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्यासोबत पोलीस दलातील जे अधिकारी कर्मचारी होते, त्यांचेच या पदकामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. गेल्या ३३ वर्षांमध्ये मी जे कार्य करू शकलो त्यामध्ये या सर्वांचा सहभाग होता, म्हणूनच माझी सेवा वैशिष्ट्यपूर्ण आहे असे भारत सरकारला वाटले आणि त्याचा गौरव माननीय राष्ट्रपतींनी केला, असे स्पष्ट करून फुलारी म्हणाले, नागरिक, विद्यार्थी, महिला यांच्याबरोबर आमचा सातत्यपूर्ण संवाद राहायला हवा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. समाजातील घटकांना आमच्याकडून वेळोवेळी मदत झाली पाहिजे. जर पोलीस दलातील कोण चुकत असेल तर ते माझ्या अथवा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आपण निदर्शनास आणू शकता. महाराष्ट्र शासनाने सध्या सात कलमी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये शासनाची सर्व खाती व त्यांचे अधिकारी यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. या मधून स्पर्धा घेऊन राज्यभरात एक चांगल्या प्रकारचे लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्याची महाराष्ट्र सरकारची योजना आहे. या योजनेचे ५० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये सातारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे हे सांगण्यास मला आनंद वाटतो. जेव्हा या योजनेतील शंभर दिवस पूर्ण होतील आणि सर्वांच्या कामकाजाचे मूल्यमापन होईल, तेव्हा सातारा जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करेल असा विश्वास सुनील फुलारी यांनी यावेळी व्यक्त केला.

पुसेगाव पोलीस ठाण्याचा आदर्श घ्यावा
राज्याप्रमाणे केंद्र शासन स्तरावर देखील स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत देशभरातून केवळ दहा पोलीस ठाण्याची निवड केली जाते. दिल्ली येथील समिती या बाबतचे मूल्यमापन करते. यासाठी विविध प्रकारचे निकष असतात. त्या आधारे देशातील सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांची निवड करण्यात येते. या प्रकारे देशभरातून निवड करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस ठाण्याचा समावेश आहे. त्यामुळे पुसेगाव पोलीस ठाण्याचा आदर्श जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाणे घेतील व त्यांच्याप्रमाणे आपली कामगिरी आदर्शवत करतील असा विश्वास यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी व्यक्त केला.
प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांची मान उंचावली
केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरात केवळ ३५ जणांना राष्ट्रपती पदकाने गौरविले जाते. सुनील फुलारी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळाले आहे. यावरून आजवरच्या सेवेतील त्यांची कामगिरी किती महत्वपूर्ण आहे हे दिसून येते. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना जरी हे राष्ट्रपती पदक मिळाले असले तरी कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांची मान निश्चितपणे उंचावली आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला आहे, त्यांनी नक्कीच या मधून प्रेरणा घेतली असेल. नागरिकांसाठी ते आणखीन चांगल्या पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी उद्युक्त झाले असतील. जर आपणही दर्जेदार पद्धतीने काम केले तर नक्कीच केंद्र शासन त्याची दखल घेईल असा आत्मविश्वास या सर्वांमध्ये निर्माण झाला असेल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमात प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी, सूत्रसंचलन प्रमोद रणवरे यांनी केले. आभार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी मानले.
कार्यक्रमास फलटण शहर, फलटण ग्रामीण, खंडाळा, लोणंद व शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, लायन्स क्लब, सेवाभावी संस्था, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

