जनकल्याण यात्रेचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ ; मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे जिल्ह्यात योजनांचा जागर

फलटण : विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने जनकल्याण यात्रा २०२५ चा
शुभारंभ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, तर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी हिरवा झेंडा दाखवून मोबाईल एलईडी व्हॅन मार्गस्थ केली.

विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने जनकल्याण यात्रा २०२५ चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम मोबाईल एलईडी व्हॅनमार्फत सातारा जिल्ह्यात करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, संजय गांधी विभागाच्या तहसीलदार स्मीता पवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये जनकल्याण यात्रचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचणार आहे. कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, त्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या हातात मिळावी, यासाठी डी.बी.टी. पोर्टल द्वारे त्यांना त्यांची विशेष सहाय्य मदत त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेतून दिरंगाई थांबली आहे. समाजातील गरजू, निराधार, निराश्रीत आणि वृद्धांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच कटीबद्ध आहे आणि यापुढेही राहील. समाजातील सर्व गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना या विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळावी, यासाठी विशेष सहाय्य विभाग कार्यरत असून सदर योजनेचा प्रसार जिल्ह्यात करण्यात येत आहे तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहण ही जिल्हाधिकारी यांनी या वेळी केले.
विशेष सहाय्य विभागाच्या श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य शासन व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत. लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक असून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन लघुपटाच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!