
फलटण : पंढरपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेत फलटणच्या राजवीर धीरज कचरे याने १० वर्षाखालील गटात १०० व ५० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सलग तिसऱ्या वर्षीही सुवर्णपदक मिळवले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे राजवीर कचरे हा ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन बनवला आहे. सदर यशाबद्दल राजवीर याचा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
राजवीर हा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या स्व.शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्या मंदिर, कोळकी शाळेचा विद्यार्थी असून तो इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे. त्याला प्रशिक्षक राज जाधव, तायाप्पा शेंडगे, महाराष्ट्र पोलीस सचिन फाळके, धीरज कचरे, सौ.रुपाली कचरे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर यशाबद्दल राजवीर कचरे याचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर आदींसह सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे.

