निरा नदीचे ते १६ टीएमसी पाणी विरोधकांनी मिळवून दाखवावे ; पाण्यासाठी पक्ष व वैयक्तिक दोष बाजूला ठेवा : आमदार रामराजे

फलटण : गेली तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी पाणी क्षेत्रात आपण काम केले आहे. निरा देवघरची क्षमता आपण साडेआठ टीएमसी वरून ११ टीएमसी करून घेतली, परंतु जर नाटंबी धरण झाले असते तर हेच धरण २७ टीएमसीचे झाले असते व पाण्याचा प्रश्नच आला नसता, हे पाणी अगदी पंढरपूर पर्यंत गेले असते. मग हे १६ टीएमसी पाणी गेले कुठे त्याचा आजतागायत कोणालाही पत्ता लागला नाही ते पाणी जे ‘पाणीदार’ आहेत त्यांनी मिळवून दाखवावे असे आव्हान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहे.
फलटण येथील ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रामराजे यांनी सदर सवाल केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम जवाहर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
निरा नदीमध्ये पाणी आहे परंतु ते वळवण्यासाठी जी राजकीय ताकद लागते, ती आज माझ्याकडे नाही. ही बाब उच्चस्तरीय आहे जर केंद्र सरकारने मनावर घेतलं तर निश्चितपणे सर्वांची पिण्याची व शेतीची तहान भागेल एवढं पाणी आहे, आणि या १६ टीएमसीचा हिशोब कोणीही काढण्याचा प्रयत्न केलेला नाही, तो काढला जावा अशी मागणी करून आमदार रामराजे म्हणाले, पाणी वाटपासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्यात यावी याबाबतची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु ती बैठक घेतली गेली नाही. त्यामुळे आम्हाला आता आमची भूमिका पुणे येथे होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये मांडावी लागणार आहे. मला विनाकारण झगडा करण्याची सवय नाही मी जेव्हा जेव्हा मागणी केली आहे, ती मागणी पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल हेही मी सांगितले आहे. पैसे नसतानाही कृष्णा खोरे ची स्थापना करण्यात आली, त्याला पैशांसाठी आपण कर्जरोख्याचा मार्ग काढून दिला. त्यामुळे कुणाचे नुकसान झाले अथवा नसेल परंतु शेतकऱ्यांना पाणी मिळालं हे नाकारता येणार नाही. आज फलटण तालुक्यात सुमारे तीस लाख टन ऊस झाला आहे. परंतु जर तालुक्याच्या वाट्याचे पाणी कमी होत गेले तर त्याचा परिणाम निश्चितपणे ऊस क्षेत्र व अन्य पिकांच्या क्षेत्रावर ती होणार आहे. वाढीव पाणी वाटपाच्या प्रश्नामुळे फलटण खंडाळा व काही अंशी माळशिरस तालुक्यातील काही बागायतदारांचा हा जो प्रश्न तयार झालेला आहे अथवा होत आहे तो जाहीरपणे जनतेसमोर मांडावा लागणार असल्याचे रामराजे यांनी यावेळी सांगितले.
नदीवरचे बंधारे भरण्याची तरतूद करावी
भोर तालुक्यातील नदीवरील केटीवेअर्स हे नदी जशी वाहते तसे ते ऑटोमॅटिक भरले जातात. परंतु खंडाळा, फलटण, बारामतीचे जे केटीवेअर्स नीरा नदीवर आहेत, त्याला पाण्याची तरतूदच नाही. त्यामुळे ही तरतूद करून घ्यावी व आम्हाला चार टीएमसी मधलं पाणी देण्यात यावे. बचत झालेले पाणी हे लाभक्षेत्रात मागणे हे गैर आहे असं आपणास वाटत नाही.
अजित पवार यांच्या कबुलीला जनता साक्षी
नीरा देवघर च पुनर्वसन हे कोणत्याही मंत्र्याला शक्य नव्हतं परंतु ते रामराजे यांनी करून दाखवलं अशी स्पष्ट कबुली अजित पवार यांनी जाहीरपणे दिली होती, त्यास फलटणची जनता साक्षीदार आहे.
राजकारण विरहित सामूहिक प्रयत्न आवश्यक
गेल्या ३० वर्षात पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ फलटण तालुक्याला आलेली नाही, आम्ही ते मिळवलं. परंतु यावेळी जर सर्वांनी एकत्र पक्षविरहित प्रयत्न केले, वैयक्तिक द्वेष बाजूला ठेवले तर निश्चितपणे फलटण तालुक्याचे पाणी तालुक्यालाच मिळेल, त्यामुळे तुम्हीही हीच मागणी मांडा जी आजवर तुम्ही मांडत होता, तीच मी सखोल व अभ्यासपूर्णपणे मांडत आहे की १६ टीएमसी पाण्याचा झालं काय ? परंतु आता त्यांना प्रश्न पडेल की तुम्ही इतके वर्ष होता मग तुम्हाला हे १६ टीएमसी पाणी का मिळाले नाही, तर ते यांनी मिळून दाखवावे कारण मी पाणीदार नाही. जे पाणीदार आहेत त्यांनी ते मिळवावे असा चिमटाही आमदार रामराजे यांनी यावेळी विरोधकांना काढला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!