सशक्त आणि उज्वल भारताच्या निर्मितीसाठी संतांचे साहित्य प्रेरणादायी : स्वामी गोविंद देव गिरि

फलटण : सशक्त आणि उज्वल भारताच्या निर्मितीसाठी संतांचे साहित्य प्रेरणादायी आहे. विश्ववंदिता भारत देशाच्या निर्माण प्रक्रियेत संतांचे साहित्य हे वेदाचे सार असून ते जगाच्या कल्याणासाठी प्रेरक आहे असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरि यांनी केले.
सखोल अभ्यास फौंडेशन यांच्यावतीने मोशी (पुणे) येथील वेदश्री तपोवन येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वामींचा अमृत महोत्सवी सोहळा व अयोध्येतील वेदपाठ शाळेसाठी निधी अर्पण समारंभात, ते बोलत होते.
यावेळी समर्थांचे दासबोधातील विचार इतर ग्रंथापेक्षा वेगळे व प्रभावी कसे आहेत हे अनेक संदर्भ देऊन सांगत स्वामी गोविंद देव गिरि महाराजांनी दासबोध सखोल अभ्यास परिवार तर्फे देण्यात आलेल्या या निधीचा विनियोग अयोध्येतील नियोजित समर्थ रामदास स्वामी वेदपाठ शाळेसाठी करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी समर्थ रामदास स्वामी आणि उपक्रमाच्या संयोजक पूजनीय अक्का वेलणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ओमकार जोशी यांनी सद्गुरु स्तवन या दासबोधातील समासाचे वाचन केले. स्वामी गोविंददेव गिरि यांचा परिचय सौ वृंदा जोगळेकर यांनी करून दिला. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन तर्फे स्वामी गोविंद देव गिरि यांचा शाल, श्रीफळ, वस्त्र, मानपत्र आणि रुपये अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा निधी देऊन सत्कार करण्यात आला व ७६ दिव्यांनी त्यांचे औक्षण करण्यात आले.

या कार्यक्रमात लेखिका निर्मलाताई देवस्थळी लिखित ‘भागवतातील गीते’, शिलाताई देशमुख यांचे ‘दासबोधातील माणिक मोती’, डॉ. विजय लाड यांचे ‘समर्थांची पत्रे आणि समर्थांचे उपदेश पर काव्य’, पुष्पा प्रभुणे यांचे ‘गीतेतील नवविधा भक्ती’ आणि विश्वनाथ प्रभुणे यांचे ‘ज्ञानबोध’ या ग्रंथांचे प्रकाशन स्वामी गोविंददेव गिरि यांचे हस्ते करण्यात आले.
फाउंडेशनचे संचालक विजय लाड यांनी प्रस्तावनेत संत रामदास स्वामींचा दासबोध जनमानसात सर्व दूर पोहोचवण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन दासबोध सखोल अभ्यास मंडळाने अपार परिश्रम घेतल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अपर्णा वांगीकर, मेधा कुलकर्णी, रंजना पाटील, अनिल वाकणकर, आनंद जोगळेकर, बाळासाहेब पाटील, माधवी पानसे, विनया विद्वांस, विनायक विद्वांस, विवेक थिटे आदींनी परिश्रम घेतले. संतोष सप्रे यांनी संचालन केले. प्रिती जोशी यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण व देश, विदेशातील साधकांसाठी थेट प्रक्षेपण केले. अंजली खळदकर यांनी “पावन भिक्षा दे दो राम” ही प्रार्थना गायली. शुभदा थिटे यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!