
फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथील केंद्र क्रमांक १००२ येथे आज (दि.२२) पासून सुरू होत असलेल्या फेब्रुवारी- मार्च २०२५ मधील इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेकरता प्रविष्ट झालेल्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांसमवेत ‘कॉपीमुक्त अभियान’ उपक्रमाची शपथ घेऊन त्यांचे गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत केंद्र संचालिका व्ही.के. सुरवसे,उपकेंद्र संचालिका एस.एम. भागवत व उपकेंद्र संचालक अजय वाघमारे, प्रशालेचे प्राचार्य एस.बी. थोरात, उपप्राचार्य पी.डी. घनवट यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पेन देऊन करण्यात आले. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेकरिता शुभेच्छा देऊन सदर परीक्षा विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त, भयमुक्त, तणाव विरहित व आनंदी वातावरणात द्यावी असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण व सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण मधील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

