आसू-देशमुखवाडी ते वारुगड पायथा सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम वेगात सुरु ; रस्ता रुंदीकरण प्रक्रियेत अडथळा ठरणारी झाडे काढून त्यांचे पुनर्रोपन सुरु

फलटण : आसू-देशमुखवाडी ते गिरवी-वारुगड घाट पायथ्या पर्यंत सुमारे ४७ कि. मी. अंतरातील सिमेंट काँक्रिट रस्ता, साईड पट्ट्या, त्यावरील छोटे-मोठे पूल अशा २१६ कोटी रुपये खर्चाच्या कामाची जबाबदारी राज इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी प्रा. लि., पुणे यांच्यावर सोपविण्यात आली असून कंपनीचे प्रमुख राम निंबाळकर यांनी या कामाची सुरुवात केली आहे.
देशमुखवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील पश्चिमेकडील शेवटचे गाव असून तेथून सातारा जिल्ह्यात आसू – पवारवाडी – खटकेवस्ती – राजाळे – धूळदेव इथपर्यंत आणि गिरवी नाका फलटण – निरगुडी – गिरवी – वारुगड पायथा (जाधववाडी) येथ पर्यंत हा रस्ता होणार आहे.
या संपूर्ण रस्त्याची सिमेंट काँक्रिट रुंदी ७ मीटर असून त्याच्या दोन्ही बाजूंना १.५ मीटर साईड पट्टी असून त्यापैकी १ मीटर पेव्हींग ब्लॉक फक्त गावातील साईड पट्टीवर असणार आहेत, आणि त्या पलीकडे १ मीटर रुंदीचे काँक्रिट गटर राहणार आहे. या संपूर्ण ४७ कि. मी. अंतराच्या रस्त्यावर उच्च दर्जाच्या सिमेंट काँक्रिट मध्ये ६२ ह्युम पाईप पूल, २ मोठे पूल आणि २ कॉज वे असणार आहेत.
पहिल्या टप्प्यात गिरवी नाका, फलटण – निरगुडी – गिरवी – वारुगड पायथा (जाधववाडी) येथपर्यंतचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्याच्या संपूर्ण डांबरी रस्त्याचे वरील डांबर काढून घेऊन त्यावर मुरुम टाकून सदर रस्त्याचे मजबुतीकरण केल्यानंतर अर्धा रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी तयार केला जात असून नंतर त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.
रस्ता खोदताना पाण्याच्या पाईप लाईन, ड्रेनेज लाईन मध्ये येत असतील तर त्यांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाते, तरीही धक्का लागलाच तर त्याची दुरुस्ती प्राधान्याने केली जात आहे, नंतर रस्त्याचे काम पुढे सुरु केले जाते. रस्त्याच्या या कामात अडथळा ठरणारी जुनी झाडे, तोडून टाकण्याऐवजी शास्त्रीय पद्धतीने ती मुळासकट काढून घेऊन त्याचे पुनर्रोपन करण्यात येत असून अशी पुनर्रोपन केलेली झाडे, पुन्हा लागली असून, त्यांची पाने पुन्हा हिरवीगार दिसू लागली आहेत.
संपूर्ण खोदाई पूर्ण होईपर्यंत वाहतुकीची अडचण झाली तरी त्यांना पर्यायी मार्ग काढून देण्यात आले असून आता प्रत्यक्ष काँक्रिटीकरण अर्ध्या भागात पूर्ण करुन त्यावरुन वाहतूक सुरु झाल्यावर राहिलेल्या अर्ध्या भागाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याने वाहतूक सुरळीत सुरु राहणार आहे.
रस्त्याच्या या कामात संबंधीत सर्वच गावातील ग्रामस्थांचे उत्तम सहकार्य लाभत असल्याने सदर काम मुदतीपूर्वी पूर्ण होईल मात्र कामाचा दर्जा निश्चित चांगलाच राहिल याची ग्वाही राम निंबाळकर यांनी दिली आहे. राम निंबाळकर यांनी यापूर्वी समृध्दी महामार्गाचे आणि त्यावरील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलांची कामे मुदतीत आणि दर्जेदार केल्याबद्दल त्यांचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यथोचित सन्मान करुन त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी नेहमी मुदतीत आणि दर्जेदार काम ही संकल्पना जपली असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक व अन्य राज्यात केलेल्या कामांच्या उत्तम दर्जाबद्दल त्यांचे नेहमीच कौतुक होत असते, तसेच सातारा जिल्ह्यातील धोम – बलकवडी प्रकल्पाचे कामाबद्दल तर त्यांचे नेहमीच कौतुक होत आहे.
झिरपवाडी येथे या कामाच्या साईट ऑफिस मध्ये या रस्त्याच्या कामासंबंधी आवश्यक माहिती उपलब्ध आहे, साईट मॅनेजर भोसले हे येथील संपूर्ण यंत्रणा कुशलतेने हाताळत आहेत, सर्व अधिकारी/कर्मचारी यांना दर्जेदार आणि मुदतीत काम पूर्ण करण्याची सवय असल्याने हे काम ही निश्चित दर्जेदार आणि मुदतीत पूर्ण होईल असा विश्वास सर्वजण व्यक्त करीत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!