
फलटण : फलटण शहरातील रविवारच्या आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न कळीचा मुद्दा बनला आहे. मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सदर जागेच्या प्रश्नी गुरुवार (दि.२०) रोजी निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांनी या प्रश्नावर लवकरच फलटण नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्यात बैठक घेऊन सदर बैठकीत निर्णय घेण्यात येईल याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान सदरचे पत्रक म्हणजे मुख्याधिकारी यांचा वेळकाढुपणाचे धोरण असल्याची चर्चा होत असून गेल्या पाच दिवसात त्यांनी याबाबत पाऊले का उचलली नाहीत असा सवाल व्यक्त होत आहे.
भाजी मंडईच्या जागेच्या प्रश्नावरून भाजी विक्रेते आक्रमक झाले आहेत. सोमवार (दि.१७) रोजी याबाबत मुख्याधिकारी, काही माजी नगरसेवक व भाजी विक्रेते यांची बैठक फलटण नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पार पडली होती. या बैठकीत भाजी विक्रेत्यांनी पोटतिडकीने आपली भूमिका मांडून व व्यवसायातुन होत असलेली आर्थिक उलाढाल स्पष्टपणे मांडून आठवडी बाजार हा पूर्ववत माळजाई मंदिर परिसरातच बसविण्यात यावा अशी आग्रही मागणी केली होती. त्यावेळी मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी आपण गुरुवारी याबाबत निर्णय देऊ असे स्पष्ट केले होते. यानंतर शहरातील व्यापाऱ्यांनीही शहारातच पूर्वी प्रमाणे बाजार बसाविण्यात यावा अशी मागणी करून त्या बाबतचे निवेदन दिले होते. वास्तविक गेल्या पाच दिवसामध्ये यावर पालिका प्रशासनाकडून तोडगा निघणे अपेक्षित होते. मुख्याधिकाऱ्यांनी काल शुक्रवार (दि.२१) रोजी प्रसिद्धी पत्रक जारी केले त्यामध्ये माळजाई मंदिर परिसर हे शहरातील एक महत्वाचे ठिकाण असल्यामुळे सदर ठिकाणी आठवडी बाजार भरविणे उचित होईल किंवा कसे ? तसेच मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची दुकाने, घरे असल्यामुळे तसेच अरुंद रस्ते यामुळे आठवडा बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या गर्दीचा प्रश्न तसेच वाहतुकीची समस्या, या सर्व बाबींचा सारासार विचार करता दर रविवारी भरविण्यात येत असलेला आठवडी बाजार हा शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ या ठिकाणी भरविण्यात यावा किंवा पूर्वीप्रमाणेच माळजाई मंदिर परिसरामध्ये भरविण्यात यावा किंवा कसे ? याबाबत नगरपालिका प्रशासन व फलटण शहर पोलीस प्रशासन यांची लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असून सदर बैठकीमध्ये उपरोक्त सर्व नमूद मुद्यांच्या अनुषंगाने चर्चा करून फलटण शहराच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेण्यात येईल असे त्यामध्ये नमूद केले आहे.

बैठकीत मुख्याधिकारी काय म्हणाले होते…
दि. १७ फेब्रुवारीच्या बैठकीत बाजाराची जागा माळजाई परिसराची ठेवायची की पूर्वी ज्या आतल्या पेठेतल्या जागा होत्या त्या ठेवायच्या किंवा कोणाला कोठेही बसण्याची परवानगी द्यायची या तीन गोष्टी असून त्यापैकी एक निर्णय आम्हाला घ्यायचा आहे. त्याच बरोबर आठवडी बाजारात जे शेतकरी अथवा व्यापारी बसणार आहेत. त्यांच्या साठी एका विक्रेत्याला जागेचे मोजमाप हे ठरवून देणे, त्यापेक्षा जास्त जागेचा वापर झाला तर दुप्पट अथवा तीनपट पावती आकारली जावी का ? या गोष्टींचे आम्ही दोन तीन दिवसांमध्ये नियमण करू व त्या संदर्भातील आदेश गुरुवारी काढू असे मुख्याधिकारी यांनी जाहीर केले होते.
भाजी विक्रेते व व्यापारी काय म्हणतात….
गेली अनेक वर्षे रविवारचा आठवडी बाजार हा फलटण शहरात भरत आहे. परंतु कोविड काळात सुरक्षिततेच्या करणावरून तो माळजाई मंदिर परिसरात हलविण्यात आला, सुरुवातीस तेथे भाजी विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागले परंतु त्यांचा व्यवसाय आता तेथे सेट झाला असल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे, या परिसरात मोठे रस्ते, शहराच्या तुलनेत कमी रहदारी, बसायला ऐसपैस जागा व व्यवसायही चांगला होत असल्याने ती जागा बदलू नये असा त्यांचा आग्रह आहे. दुसरीकडे शहरात रविवारचा आठवडी बाजार भरत आहे. या आठवडी बाजारामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढतोय, काळानुरूप मुख्य बाजारपेठेतून व्यापाराचा केंद्रबिंदू अन्यत्र हलला आहे. आठवडी बाजाराच्या निमित्ताने केवळ फलटण शहरच नव्हे तर ग्रामीण भागातूनही लोक मोठ्या प्रमाणात जुन्या बाजार पेठेत येतात व भाजीसह अन्य खरेदीही करतात, त्यामुळे रविवारी व्यापाऱ्यांचा व्यवसाय अन्य दिवसांच्या तुलनेत अधिक चांगला होतो, म्हणून बाजार पूर्ववत शहारातच बसवावा अशा प्रतिक्रिया व्यापारी वर्गामधून व्यक्त होत आहेत.
पर्याय आणखी एक आठवडी बाजाराचा !
फलटण शहराची व्याप्ती, लोकसंख्या, विक्रेते, खरेदीदार यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत निश्चितपणे वाढली आहे. याव्यतिरिक्त त्यामध्ये शहरालगतच्या झपाट्याने विकसित झालेल्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येचीही भर पडली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता फलटण शहरात दोन आठवडी बाजार भरविण्याचा पर्याय पालिका प्रशासनासमोर खुला आहे. प्रशासकीय सुट्टी असल्याने रविवारी भरविण्यात येणारा बाजार सध्या भरत असलेल्या माळजाई परिसरात भरविण्यात यावा व अन्य कोणताही एक वार सर्वानुमते ठरवून त्यादिवशीचा बाजार हा परंपरेप्रमाणे फलटण शहरातच बसाविण्यात यावा. जर दोन दिवस आठवडी बाजार भरले तर नागरिकांसह भाजी विक्रेते, शेतकरी व व्यापारी वर्गालाही त्याचा फायदाच होईल. अनेक शहारांमध्ये आठवड्यातून दोन वेळा बाजार भरतो. त्यामुळे या पर्यायाकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे.

