संजीवराजे यांच्या निवासस्थानी आयकर विभागाची चौकशी ! राजकीय आकसातून कारवाईचा राजे समर्थकांचा आरोप

फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील ‘सरोज व्हीला’ निवासस्थानावर व गोविंद मिल्कच्या फलटण व पुणे कार्यालय येथे आयकर विभागाच्यावतीने चौकशीची कारवाई सुरु करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. सकाळी लवकर या कारवाईस सुरुवात करण्यात आली असून याबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. या परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान या कारवाईने राजे गट समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण असून राजकीय आकसापोटी व सूड बुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप व्यक्त होत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकामध्ये फलटण विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आमदार दीपक चव्हाण यांना पक्षाचे तिकीट जाहीर केले होते. परंतु तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार ) जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी ऐन निवडणुकीच्या धामधूमीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता व तत्कालीन आमदार दीपक चव्हाण यांनाच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते, परंतु त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) चे उमेदवार सचिन कांबळे-पाटील यांनी पराभूत केले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशनाट्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच दुखावले होते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून संजीवराजे हे पुन्हा स्वगृही परतणार अशी जोरदार चर्चा तालुक्यात सुरु असतानाच सदर आयकर विभागाची धाड पडल्याने सर्वत्र उलट सुलट चर्चेला ऊधाण आले आहे.
सदर कारवाईची माहिती सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली, त्यानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यासमोर माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक यांच्यासह राजे गट समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. राजकीय आकसातून व राजकीय सूड घेण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप घटनास्थळावरील उपस्थितांमधून व्यक्त होत होता.

सत्यजितराजे यांचीही होणार चौकशी !
गोविंद मिल्कचे संचालक सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांचीही यावेळी चौकशी होणार आहे, परंतु ते सद्यस्थितीमध्ये दिल्ली मध्ये आहेत. ते फलटणकडे तातडीने निघणार आहेत. त्यांना यायला वेळ लागणार असून ते आल्यानंतर त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!