फलटण : केबी ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना यंदाचा ‘शरद कृषी उद्योजक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. लोणंद ता. खंडाळा येथे शरद कृषी महोत्सवात माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
कृषी क्षेत्रात आपला जो दृष्टिकोन आहे तो बरोबर आहे, हे आम्ही जगाला दाखवून देऊ अगामी काळात जगामध्ये प्रत्येकाच्या आहारात व ताटात सेंद्रिय फळे असायला पाहिजेत या उद्दिष्ट्याने कार्यरत असणारे सचिन यादव यांचा जन्म शिरवली ता. बारामती येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. बारामती, फलटण व पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले. शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना व्यवसायाचे बाळकडू घरामधूनच प्राप्त झाले. कृषी क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचे या ओढीने शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे, नवनवीन प्रयोग, शोध या बाबत माहिती घेणे, वाचन करणे यामधूनच त्यांच्या मनामध्ये कृषी क्षेत्रात काम करण्याची बीजे रोवली गेली आणि त्यातूनच के.बी. एक्सपोर्टस इंटरनॅशनलची मुहूर्तमेढ त्यांनी फलटण तालुक्यात रोवली. केबी च्या माध्यमातून यादव यांनी शेतकऱ्यांशी त्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला, याद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या शेती विषयी अडचणी, समस्या जाणून घेतल्या. शेती मालाच्या निर्यातीसाठी त्यांनी रेसिड्यू फ्रि उत्पादनांची संज्ञा शेतकऱ्यांमध्ये बिंबविली. निर्यातक्षम शेतीमाल उत्पादीत करून ‘केबी’ च्या माध्यमातून त्याची बाहेरच्या देशात निर्यात करणे यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त केले. आज तालुक्यातून भेंडीसोबतच डाळिंब, बेबीकॉर्न, आंबे, कडीपत्ता, दुधी अशा ताज्या पालेभाज्या व फळे यांची मोठ्या प्रमाणात होत असणारी निर्यात व विदेशी म्हणून ओळख असणारे ड्रॅगन फ्रूट ची होत असणारी निर्यात हा त्याचाच परिपाक आहे. शेतीमध्ये वाढत्या रासायनिक कीटनाशकाचे धोके शेती मालाच्या निर्यातीमध्ये अडथळे ठरू शकतात हे लक्षात घेऊन त्यावर सचिन यादव यांनी जैव कीटकनाशकाचा आश्वासक पर्याय शोधला आहे.
जैव कीटकनाशके बनवणाऱ्या के.बी. बायो आरमनिक्स कंपनीद्वारे त्यांनी रसायनमुक्त शेती बरोबरच रसायनमुक्त अन्नाचा आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आज देशातील चौदा राज्यात या कंपनीची मूळे मजबुतीने विस्तारली आहेत. इंदोर (मध्यप्रदेश) येथे कंपनीचे कार्यालय सुरु करण्यात आले असून अगामी काळात देशाची राजधानी दिल्ली येथेही कार्यालय सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे. याच बरोबर आयुर्वेदाच्या धर्तीवर यादव यांनी १०० एक्स आयुर्वेदा कंपनीची सुरुवात केली आहे. वनस्पतींचा वापर करून मानवी जीवनातील दुर्धर आजार व रोगांवर उपचार करणे हे त्यांचे प्रमुख लक्ष आहे. कृषी क्षेत्रासह सचिन यादव यांचे सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान आहे त्यांच्या आजवरच्या या सर्व कामगिरीची व कार्याची दखल घेऊनच या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली असल्याचे कंपनीचे सहाय्यक सर व्यवस्थापक हेमंत खलाटे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.