साहित्यिकांच्या हातून नवनव्या साहित्यकृती निर्माण व्हाव्यात ; साहित्यिकांना मिळणारे पुरस्कार हे ऊर्जा देणारे : प्राचार्य शांताराम आवटे

फलटण : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, फलटण यांचा सर्जाकार सुरेश शिंदे यांना मिळालेला ‘यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार’ व साहित्यिक ताराचंद्र आवळे यांना जाहीर झालेला माजी विद्यार्थी संघटना, बंडो गोपाळ मुकादम शैक्षणिक संकुल कुसूर ता. कराड यांचा ‘प्राचार्य ए.डी. अत्तार’ आदर्श शिक्षक पुरस्कार हे ‘साहित्यिक संवाद’ कार्यक्रमासाठी प्रेरणादायी व गौरवास्पद व साहित्यिकांना ऊर्जा देणारे आहेत असे प्रतिपादन मसापचे फलटण शाखेचे माजी अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले.
नाना नानी पार्क, फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वनविभाग फलटण यांच्या संयुक्त आयोजित तेवीसाव्या ‘साहित्यिक संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, साहित्यिक ताराचंद्र आवळे, रानकवी राहुल निकम, ॲड. श्रेयश कांबळे, श्रीनिवास लोंढे यांची उपस्थिती होती.
संवाद माणसाला अधिक जवळ आणतो व या जवळीकतेतून माणसांचे जीवन अधिक समृद्ध होते. त्यामुळे माणसांनी मोबाईलवरून संदेश पाठवण्यापेक्षा फोन करुन बोललेले चांगले किंवा प्रत्यक्ष भेटून बोललेले केव्हाही चांगले. साहित्यिकांनी इतरांशी आपला संवाद कायम ठेवला पाहिजे. त्यामुळे साहित्य अधिक समृद्ध होते व साहित्यिक एकमेकांशी जोडले जातात असे निदर्शनास आणून देत प्राचार्य शांताराम आवटे म्हणाले, अलीकडे पुरस्कार विकणाऱ्या काही संस्था, टोळ्या अस्तित्वात आलेल्या आहेत. या संस्थामुळे पुरस्कारांचे अवमूल्यन झाले आहे, असे पुरस्कार घेणे योग्य नव्हे. योग्य माणसाला योग्य पुरस्कार मिळाला तर माणसाची व पुरस्कारांची उंची वाढते आणि अशा पुरस्कारांमुळे जगण्याचे बळ मिळते. साहित्यिकांच्या हातून नवनव्या साहित्यकृती निर्माण झाल्या पाहिजेत व त्या योग्य वाचकाच्या हाती पडल्या पाहिजेत.
ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे म्हणाले, तरुण पिढीने अधिक वाचन करून समृद्ध झाले पाहिजे व योग्य पद्धतीने लिखाण करून समाजापुढे आणले पाहिजे असे लिखाण निश्चितपणे युवा पिढीला दिशा देईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ताराचंद्र आवळे यांनी केले. आभार श्रीनिवास लोंढे यांनी मानले. यावेळी फलटण साहित्यिक व साहित्य प्रेमी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!