जेष्ठ नागरिक ही देशाची शक्ती : देवेंद्र भुजबळ

फलटण : भारताची लोकसंख्या सुमारे दीडशे कोटी असून त्यामध्ये दहा टक्के म्हणजे जवळपास पंधरा कोटी जेष्ठ नागरिक आहेत. जेष्ठ नागरिकांना समाजाने, कुटुंबीयांनी अडचण न समजता शक्ती समजून त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवांचा, विचारांचा तरुण पिढीला आणि पर्यायाने देशाला कसा फायदा होईल, याचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन निवृत माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले.

अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघाच्या नवी मुंबईतील नेरूळ येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात चोविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, नेरूळ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री डी एन चापके आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

बदलत्या सामाजिक,आर्थिक, कौटुंबिक ,भावनिक कारणांमुळे देशातील वृद्धाश्रमांची संख्या वाढतच चालली आहे, हे कोणे एकेकाळी संयुक्त कुटुंब पद्धती असलेल्या आपल्या देशाला भूषणावह नाही. नको त्या बाबतीत आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण न करता आपला इतिहास, परंपरा, कुटुंब पद्धती, नाते संबंध यांचे महत्व आणि त्यांची प्रत्यक्ष जीवनातील उपयोगिता ओळखल्यास आज समाजात वाढत चाललेले घटस्फोट, मानसिक – शारीरिक अनारोग्य, ताण तणाव, बदलत्या कुटुंब व्यवस्थेमुळे केवळ वृद्धांचीच नव्हे तर बालकांची होणारी हेळसांड अशा कितीतरी गोष्टींना निश्चितच आळा बसू शकेल असे निदर्शनास आनून देत
सरकारच्या जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या
योजना, सोयी सुविधा,सवलती जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघ करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून देशातील सर्व जेष्ठ नागरिक संघाचे, त्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांचे संघटन वाढले पाहिजे, अशी अपेक्षाही भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक संघ आणि अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघाच्या वाटचालीचा आढावा सादर करून त्यांची कामगिरी, वाटचाल, भावी उपक्रमांची माहिती दिली. जेष्ठ नागरिकांनी आयुष्यात आनंदी राहून इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नेरूळ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी एन चापके यांनी बोलताना सांगितले, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, १९७० च्या दशकात जेष्ठ नागरिकांसाठी संघटना स्थापन करण्याची गरज जगभर भासू लागली. म्हणून १९८२ साली युनो ने प्रत्येक देशाने आपले जेष्ठ नागरिकांसाठी धोरण असावे , असे आवाहन केले. परंतु भारतात असे धोरण १७ वर्षांनी जाहीर झाले. २००१ साली डॉ किंजवडेकर यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकार कडे विविध मागण्या सादर केल्या. परंतु राष्ट्रीय स्तरावर असा संघच नसल्याने ७ राज्यातील लोकांनी एकत्र येऊन २००१ साली अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघाची स्थापना केली गेली. या संघाचे पहिले अधिवेशन २००३ साली मुंबईत, तर पुढील अधिवेशने २००७ जयपूर, २००८ दिल्ली
अशी झाली असून आता या संघाची सदस्य संख्या ३० लाख झाली आहे. या संघाच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने २००७ साली पहिल्यांदा जेष्ठ नागरिकांसाठी धोरण जाहीर करून जेष्ठ नागरिक कायदा लागू केला. पण या कायद्यात सुधारणा करावयाचे विधेयक संसदेत अनेक वर्षे तसेच पडून असल्याबद्दल खेद व्यक्त करून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदा जेष्ठ नागरिकांसाठी रेल्वे भाड्यात ३० टक्के सवलत चालू केली. पुढे वाढून ती ५० टक्के इतकी झाली. पण कोरोणा पासून स्थगित करण्यात आलेली ही सवलत त्वरित लागू करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी चापके यांनी बोलताना केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रभाकर गुमास्ते यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!