पोंभुर्ले येथे ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण ; जिल्ह्यातील डॉ. प्रमोद फरांदे, ॲड. रोहित अहिवळे, यशवंत खलाटे सन्मानित

फलटण : ‘‘सहा जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन नसून ‘दर्पण’ या वृत्तपत्राचा शुभारंभ दिन आहे. बाळशास्त्रींचा जन्म २० फेब्रुवारी १८१२ रोजी पोंभुर्ले येथे झाला. आजच्या पत्रकार दिनाला काही जण बाळशास्त्रींची जयंती समजतात हे दुर्दैवी आहे. मुंबईत जावून बाळशास्त्री जांभेकरांनी ब्रिटीश काळात ‘दर्पण’ च्या माध्यमातून केलेले काम व्यवस्थित समजून घेवून त्यादृष्टीने आजच्या पत्रकारांनी पत्रकारिता करावी’’, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांनी केले.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ३२ व्या राज्यस्तरीय दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राजाभाऊ लिमये, मराठवाडा विभाग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या हस्ते पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या दर्पण’ सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी लिमये बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके, महाराष्ट्र राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, पोंभुर्ले गावच्या सरपंच सौ.प्रियांका धावडे, उपसरपंच सादीक डोंगरकर, अ‍ॅड.प्रसाद करंदीकर, सुधाकर जांभेकर यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या कार्यात पत्रकारांनी योगदान द्यावे

राजाभाऊ लिमये पुढे म्हणाले, ‘‘मी सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रात यापूर्वी कार्यरत होतो; ५० हून अधिक वर्षे पत्रकारिता केली. त्यानंतर या सगळ्या कार्यातून निवृत्त झालोय. पण रविंद्र बेडकिहाळ यांच्याकडून सुरु असलेल्या बाळशास्त्री जांभेकरांच्या निष्ठापूर्वक स्मरण कार्याला मी सातत्याने मदत करत असतो. पोंभुर्ले ही बाळशास्त्री या आपल्या आद्यपत्रकाराची जन्मभूमी असल्याने येथील महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या स्मारक कार्यात राज्यातील सर्व पत्रकारांनी आपले योगदान द्यावे’’, असेही आवाहन यावेळी लिमये यांनी केले.

पोंभुर्लेतील पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व : डॉ. जगदीश कदम

डॉ.जगदीश कदम म्हणाले, ‘‘पत्रकारितेची वाट समृद्ध करणार्‍या बाळशास्त्रींचे चरित्र सोप्या भाषेत उपलब्ध करुन देण्याचे काम पत्रकारांसाठी उपयुक्त आहे. ज्याप्रमाणे डोळ्याला आरशात पाहिल्याशिवाय आपले काजळ दिसत नाही; त्याप्रमाणे पत्रकारांकडून सुरु असलेले चांगले काम त्यांनाच दाखविणारा आरसा म्हणजे आजचे ‘दर्पण’ पुरस्कार आहेत. बाळशास्त्रींच्या जन्मभूमीत वितरित होणार्‍या या पुरस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व असून याची तुलना इतर कोणत्याही महान पुरस्काराशी होऊ शकत नाही.’’

पत्रकारांनी लोकशिक्षकाची जबाबदारी घ्यावी : सुभाष धुमे

सुभाष धुमे म्हणाले, ‘‘आज बहुताल अस्वस्थ आहे. त्यामुळे पत्रकारांसमोर मोठे आव्हान असून समाजाला नेमकी दिशा देण्याची, त्यांचा संभ्रम दूर करण्याची लोकशिक्षकाची जबाबदारी पत्रकारांनी स्विकारावी. ब्रिटीश राजवटीत बाळशास्त्रींनी समाजपरिवर्तनाचं अभूतपूर्व कार्य केले. तसे कार्य आपण निर्भीडपणे करतो का? याचे आत्मचिंतन प्रत्येक पत्रकाराने करावे. ज्याला न्यायाची गरजं आहे त्याच्यासाठी आपण काम केले तर बाळशास्त्रींचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे.’’

पोंभुर्लेत पत्रकारिता महाविद्यालय सुरु करण्याचा मानस : रविंद्र बेडकिहाळ

रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘‘बाळशास्त्रींनी मराठी माणसाचा आवाज ब्रिटीश सरकारपर्यंत पोचवण्यासाठी ‘दर्पण’ या मराठी वृत्तपत्राची सुरुवात करण्याचे धाडसी काम केले. शिक्षण, सामाजिक, विज्ञान, पुरातत्त्व संशोधन, धर्मचिकित्सा आणि पत्रकारितेतून समाजजागरण असे काम जांभेकरांनी केले. ‘दिग्दर्शन’ या पहिल्या मराठी मासिकाच्या माध्यमातून पहिले मराठी ग्रंथ समिक्षकही बाळशास्त्री ठरतात. असे विविधांगी बाळशास्त्रींचे काम आजच्या पत्रकारांनी समजून घेणे आवश्यक आहे. गावोगावी विठ्ठलाची मंदीरे असली तरी जसे पंढरपूरच्या मंदीराला विशेष महत्त्व आहे तसेच महत्त्व पोंभुर्ले येथील स्मारकाला असल्याने या मातीतला पुरस्कार पत्रकारांसाठी महत्त्वाचा आहे’’, असे सांगून ‘‘येत्या काळात पोंभुर्ले ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे पत्रकारितेचे शिक्षण देणारे महाविद्यालय सुरु करण्याचा आमचा संकल्प आहे’’, असेही बेडकिहाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रारंभी बाळशास्त्रींची पालखी वाद्यांच्या गजरात स्मारकामध्ये आणण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व बाळशास्त्रींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘दर्पण’ स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या ३२ व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण संपन्न झाले. त्यामध्ये श्रीकांत रामभाऊ साबळे (आवृत्ती संपादक, दै.पुण्यनगरी, पुणे), दिपक एस. शिंदे (आवृत्ती प्रमुख, दैनिक लोकमत, सातारा), नवनाथ कुताळ (प्रतिनिधी, दै.दिव्यमराठी, श्रीरामपूर), सौ.विमल विठ्ठलराव नलवडे (संपादिका, सा.धनसंतोष, कोरेगाव, जि.सातारा), अ‍ॅड.रोहित शामराव अहिवळे (संपादक, दै.गंधवार्ता, फलटण), यशवंत भिमराव खलाटे – पाटील (प्रतिनिधी, दै.पुण्यनगरी, फलटण), आचार्य बाळशास्त्री जांभेकर महिला ’दर्पण’ पुरस्कार श्रीमती शोभना कांबळे, वरिष्ठ उपसंपादक, दैनिक लोकमत, रत्नागिरी, ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय धाडसी पत्रकार’ पुरस्कार – डॉ.प्रमोद श्रीरंग फरांदे (वरिष्ठ उपसंपादक, दै.सकाळ, सातारा), आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण’ साहित्यिक पुरस्कार – निर्मलकुमार सूर्यवंशी (रा.हडसणी, ता.हदगाव, जि.नांदेड) यांचा समावेश होता.

अहिल्यानगर येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी, अ‍ॅड.प्रसाद करंदीकर, पुरस्कारार्थी पत्रकारांच्यावतीने श्रीकांत साबळे, नवनाथ कुताळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, विश्वस्त सौ.अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, रोहित वाकडे यांनी केले. सूत्रसंचालन विश्वस्त अमर शेंडे यांनी केले आभार विजय मांडके यांनी मानले.

कार्यक्रमास पुणे, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, नांदेड आदी जिल्ह्यातील पत्रकारिता, साहित्य, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, माध्यमप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!