फलटण : छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०२४ साठी पात्र इच्छुक व्यक्ती व संस्थांनी जिल्हयाचे विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांचे कार्यालयात विहित प्रपत्रात १५ जानेवारी २०२५ अखेर अर्ज करावेत, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभाग साताराचे विभागीय वन अधिकारी एच.एस. वाघमोडे यांनी केले आहे.
सामाजिक वनीकरण विभाग साताराकडून वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०२४ देण्याचे प्रस्तावित आहे. हा पुरस्कार महसूल विभागस्तर व राज्यस्तरावरील व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम, विभाग व जिल्हा या संवर्गात देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह, प्रशस्तीपत्र या शिवाय महसूल विभागस्तरावरील प्रत्येक संवर्गामध्ये २ पुरस्कार, प्रथम रु. ५० हजार व द्वितीय रु. ३० हजार, राज्यस्तरावरील प्रत्येक संवर्गामध्ये ३ पुरस्कार, प्रथम रु. १ लाख, द्वितीय रु. ७५ हजार, व तृतीय रु. ५० हजार, तसेच वृक्षमित्र पुरस्कार वृक्षारोपणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या ३ खाजगी संस्थांना प्रोत्साहनपर प्रत्येकी रु. २५ हजार असे आहे.
यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या क्षेत्रात मागील ३ वर्ष (सन २०२१,२०२२ आणि २०२३) मध्ये केलेले कार्य उल्लेखनीय असणे ही किमान योग्यता आहे.
अर्ज विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांचे कार्यालयात उपलब्ध असून वन विभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर देखील अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक माहीतीसाठी www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर ‘वनसंपदा’ नवीन प्रशासकीय इमारत, फॉरेस्ट कॉलनी जवळ, गोडोली-सातारा, दुरध्वनी क्र. 02162-295109, Email: [email protected] वर संपर्क साधण्याचे आवाहन वाघमोडे यांनी केले आहे.