फलटण : सरत्या वर्षाला निरोप देताना उद्या मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी फलटण येथे गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., फलटण, निकोप हॉस्पिटल फलटण, फलटण डॉक्टर्स असोसिएशन, फलटण नगर परिषद आणि फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त सहभागाने शहरात चार ठिकाणी दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सुंदर फलटण, निरोगी फलटण, सुरक्षित फलटण ही घोषवाक्य घेऊन सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे.
उद्या मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळात शहरातील चार ठिकाणी गोविंद मिल्कच्या वतीने दुधाचे वाटप होणार आहे. आरोग्यासाठी दुधाचा आहार किती आवश्यक आणि उत्तम आहे याचे महत्त्व पटवून तरुण पिढीला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला यावेळी देण्यात येणार आहे.
फलटण शहरात खालील ठिकाणी दुधाचे वाटप करण्यात येणार आहे
नाना पाटील चौक येथे सायंकाळी ५.०० ते ५.१५,
आंबेडकर चौक येथे सायंकाळी ५.१५ ते ५.३०,
डी. एड. चौक येथे सायंकाळी ५.३० ते ५.४५
महात्मा फुले चौक येथे सायंकाळी ५.४५ ते ६.००
फलटण शहरामध्ये दि. ३१ डिसेंबरच्या रात्री कायदा आणि सुव्यवस्था उत्तम रहावी आणि कोणत्याही प्रकारचे दंगा गडबड गोंधळ न करता सर्व नागरिकांना येणाऱ्या नवीन वर्षाचा आनंद घेता यावा यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. फलटण शहरातील नागरिकांनी या वेळी उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.