फलटण : मानवी जीवनात व्यायामाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भविष्यातील पिढी निरोगी आणि सुदृढ असली पाहिजे. यासाठी योग्य व्यायाम, सकस आहार आणि पुरेशी विश्रांती ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन डॉ. संयुक्ताराजे धीरेंद्रराजे खर्डेकर यांनी केले.
गुणवरे ता.फलटण येथे सिद्धिविनायक सहकारी रुग्णालय गोखळी व सक्षम स्री शक्ती, आसू यांचेवतीने आरोग्य जागृती व प्रतिबंध या विषयी शिबिर पार पडले. यामध्ये “विद्यार्थिनी सक्षमीकरण” अंतर्गत आसू येथील महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या इकोफ्रेंडली सॅनिटरी नॅपकीन्सचे मोफत वाटप गुणवरे ता. फलटण येथील कै. संजय गांधी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यीनींना करण्यात आले. या वेळी डॉ.संयुक्ताराजे खर्डेकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आनंदराव जाधव होते. डॉ. शिवाजी गावडे, संस्थेचे अध्यक्ष राहूल कणसे यांची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. खर्डेकर म्हणाल्या, आजार झाल्यावर इलाज करण्यापेक्षा तो होणारच नाही याची काळजी घ्यायला हवी. युवकांमध्ये मोबाईलचे व्यसन वाढत आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे युवापिढी भरकटत चालली आहे व सामाजिक संस्कृती विसरू पाहत आहेत. अशा स्थितीत पालकांसोबत युवकांमध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे.
अधिकारी निर्माण करणारे गाव म्हणून गुणवरे गावची ओळख आहे. तो वारसा तुम्हा युवा पिढीला चालवायचा आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम असायला हवे. मुलींमधील अनेमिया म्हणजेच रक्त कमी असणे ही सर्वसाधारण बाब असली तरी ती योग्य नाही, त्यासाठी आवश्यक ती जीवनसत्वे, लोह, कॅल्शियमयुक्त आहार करणे आवश्यक व गरजेचे असल्याचे डॉ. शिवाजी गावडे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
कार्यक्रमास भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी गुणवरे संस्थेचे प्रशासन अधिकारी शिवलाल गावडे,
एस. डी. पवार, संभाजी कदम, बशीर पठाण, अमीर आतार यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत अरुणा बोबडे यांनी केले. आभार राहुल कणसे यांनी आभार मानले.